*कामठी* समाजकार्य महाविद्यालय कामठी येथील समाजकार्य अभ्यासक्रमाच्या तीन विद्यार्थ्यांनी बीएसडब्ल्यू पदवी परीक्षा - २०२२ या परीक्षेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत प्रथम, द्वितीय व नववे स्थान प्राप्त केल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव व महाविद्यालय व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. पुरणचंद्र मेश्राम होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रुबीना अन्सारी, विद्यापीठातून प्रथम मेरिट आलेली विद्यार्थिनी हर्षिता नितनवरे, द्वितीय मेरिट विद्यार्थी राहुल शामकुवर, नववी मेरिट विद्यार्थिनी ज्योत्स्ना काळसर्पे, कार्यक्रम समन्वयक डॉ.राष्ट्रपाल मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती लागली होती.
मान्यवर अतिथी व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते महात्मा जोतीराव व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व द्वीप प्रज्वलित करून समारंभाला सुरुवात झाली.
प्राचार्या डॉ. रूबीना अन्सारी यांनी प्रास्ताविक भाषणातून सत्कार समारंभाचे आयोजनामागची भूमिका विशद करून सर्व गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर विद्यापीठातून प्रथम मेरिट आलेली विद्यार्थिनी हर्षिता सुदेश नितनवरे, द्वितीय मेरिट विद्यार्थी राहुल योगेश शामकुवर व नववी मेरिट विद्यार्थिनी ज्योत्स्ना झनकलाल काळसर्पे या तिन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा डॉ. पुरणचंद्र मेश्राम व डॉक्टर रुबीना अन्सारी यांच्या शुभहस्ते प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ प्रदान करून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना तिन्ही मेरिट विद्यार्थ्यांनी गुरुजनांबद्दल कृतज्ञता प्रकट केली. जिद्द आणि चिकाटीने सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास प्रत्येक विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आपले स्थान प्राप्त करू शकतो, असा संदेशही त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
यानंतर अध्यक्षीय भाषण करताना डॉ. पुरणचंद्र मेश्राम म्हणाले, ज्ञान ही जगातील सर्वात मूल्यवान वस्तू आहे.मनुष्य कितीही प्रतिकूल परिस्थितीत जन्माला आला असला तरी आपल्या गुणवत्तेच्या बळावर तो स्वतःचे असामान्यत्व सिद्ध करू शकतो. समाजकार्य महाविद्यालयातील मेरिट आलेले विद्यार्थी ग्रामीण भागातील असूनही त्यांनी आपल्या जिद्द, परिश्रम आणि अभ्यासाच्या बळावर नागपूर विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत प्रथम, द्वितीय आणि नववे स्थान प्राप्त केले. ही घटना महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची आहे. अभावग्रस्त परिस्थितीतून शिक्षण घेत असतानाही विद्यापीठातून मेरिट घेऊन दाखवून त्यांनी मोठमोठ्या महाविद्यालयापुढे स्वतःचा आदर्श निर्माण केला आहे. असे सांगून त्यांनी अमेरिकेचे भूतपूर्व राष्ट्रपती अब्राहम लिंकन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही कशा प्रकारे स्वतःला जगापुढे सिद्ध केले याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास व उत्साह निर्माण केला. जगात शिक्षणाला पर्याय नाही. परंतु शिक्षण हे गुणवत्तापूर्ण असले पाहिजे. आपल्याकडे गुणवत्ता असेल तर संपूर्ण जगाला गवसणी घालू शकतो इतके प्रचंड सामर्थ्य शिक्षणामध्ये आहे, असे सांगून आपल्या शैलीदार व भारदस्त वक्तृत्वातून त्यांनी संपूर्ण सभागृहाला खिळवून ठेवले.
संचालन डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी केले, कविता लायबर या विद्यार्थिनीने स्वागतगीत गायले तर आभार डॉ. सविता चिवंडे यांनी मानले. सत्कार समारंभाला गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचे पालक, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच बीएसडब्ल्यू - एमएसडब्ल्यू अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.