चंद्रपूर : महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी उपाध्यक्ष अॅड. मोरेश्वर टेंमुर्डे यांचे आज ह्दयविकाराच्या धक्याने निधन झाले. या निधनाचे वृत्त समजताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी वरोरा येथील निवासस्थानी भेट देत टेंभुर्डे कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.
मनुष्य जिवन पाण्याच्या बुडबुड्यासारखे असते. मनुष्य जिवनामध्ये त्याचा जन्म येतो आणि त्याला समाजाला देऊन जावे लागते. टेमुर्डे साहेबांनी आपले उभे आयुष्य समाजासाठी, शोषित, वंचितासाठी वेचले. समाज घडविण्यामागे ते संपूर्ण जीवन जगले. ८१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. खऱ्या अर्थाने ते आमच्यासारख्या लोकांसाठी मार्गदर्शक होते. ते अजुन राहिले असते, तर आम्हाला अजून खूप शिकता आले असते. त्यांचे मार्गदर्शन, विचार आम्हाला अभिप्रेत राहिल. थोर व्यक्तिमत्वाच निधन आज झाल्यानंतर सामाजिक पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. त्यांच्या परिवाराला जे दुख झाले, त्या दुखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्याला चिरशांती प्राप्त होवो, ही इश्वरचरणी प्रार्थना करतो, अशा शोकसंवेदना यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या.
अॅड. मोरेश्वर टेंमुर्डे हे विधानसभेचे उपाध्यक्ष होते. त्यांनी या विधानसभेचे दोनवेळा प्रतिनिधित्व केले. शिक्षणाच्या माध्यमातून या भागातील गोरगरीब जनता शिकली पाहिजे, या राज्याचा पाया मजबूत झाला पाहिजे, या करिता त्यांनी या क्षेत्रात शिक्षणाची दारे मोठ्या प्रमाणात उघडली आहेत. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याचेसुद्धा काम झाले आहे. त्यासोबतच विधानसभेचे उपाध्यक्ष असताना कोणत्याही पक्षाचा भेदभाव न करता सर्व लोकप्रतिनिधी, समाजाला न्याय देण्याचे काम त्यांच्या माध्यमातून झाले.
या मतदार संघातील समस्या, राज्याच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्या माध्यमातून अग्रणी काम झाले आहे. फटकट स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जात होते. लोकांमध्ये राहणारे ते व्यक्तिमत्व होते. स्वताचा निर्णय स्वता घेणारा आपला नेता हरपला. या क्षेत्राचा पितामह असल्यासारखे त्यांचे कार्य होते. त्यांचा अनुभव सर्वांना कामी पडला. त्यांच्या निधनाने विचारांची एक पोकळी न भरून निघणारी आहे, अशा शब्दात खासदार बाळू धानोरकर यांनी शोकसंदेश व्यक्त केला.