Ø जिल्हाधिका-यांकडून जिल्ह्यात पहिला दत्तक आदेश पारीत
चंद्रपूर Chandrapur : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 नुसार अनाथ, सोडून दिलेले व परित्यागीत बालकांचे दत्तक आदेश तसेच नात्यांतर्गत दत्तक व सावत्र दत्तक करण्याकरीता दत्तक नियमावली 2022 तयार करण्यात आली आहे. त्यानुसार सदर आदेश पारीत करण्याची जबाबदारी आता जिल्हाधिका-यांना देण्यात आली असून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील पहिला दत्तक आदेश परित केल्याने चिमुकल्याला आई – वडील मिळाले आहे.
यापूर्वी सदर दत्तक आदेश न्यायालयामार्फत केले जात होते. आता मात्र ही जबाबदारी जिल्हाधिका-यांवर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार या प्रकरणाची सुनावणी करून इच्छुक पालक गिरीश गोविंदराव रणदिवे आणि भावना गिरीश रणदिवे यांच्याकडे दत्तक बालक अंकूशला देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिका-यांनी पारीत केले आहे. या दत्तक आदेशानुसार गिरीश आणि भावना रणदिवे हे अंकूशचे आई-वडील झाले आहेत. या आदेशानुसार इतर बालकांप्रमाणेच अंकूशला पूर्ण अधिकार मिळाला आहे.
सदर आदेश पारित करण्याकरीता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, जिल्हा परिविक्षा अधिकारी महेश हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, विधी तथा परिविक्षा अधिकारी सचिंद्र नाईक, किलबिल दत्तक संस्थेचे हेमंत कोठारे यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली.
बालकल्याण समिती चंद्रपूर यांच्या आदेशान्वये किलबील दत्तक संस्था येथे अनाथ, सोडून दिलेले व परित्यागीत बालकांना दाखल करण्यात येते. CARA (Central Adoption Resource Authority) CARINGs cara.nic.in या संकेतस्थळावर दत्तक इच्छुक पालक नोंदणी करून ‘कारा’ ने दाखविलेले मुल किंवा मुलीला पालकांनी राखीव केल्यानंतर दत्तक समितीद्वारे पालकांची मुलाखत घेऊन दत्तक आदेश करीता जिल्हाधिका-यांकडे अर्ज करण्यात येते.
Chandrapur | Balkalyan Samiti | Kilbil |