अंबादेवी, एकवीरा देवीची भरली ओटी
देशभरातील मंगलमुखी किन्नरांचे १ ते १५ जानेवारी दरम्यान राष्ट्रीय संमेलन अमरावतीत होत आहे. याच श्रृखंलेत सोमवारी शहरातील प्रमुख मार्गावरून कलश यात्रा काढण्यात आली. अंबादेवी, एकवीरा देवीची पूजा अर्चा करून किन्नरांनी ओटी भरली. कलश यात्रेत ढोल ताशे, ढोल- नगारा, डीजेवर किन्नारांनी सादर केलेले नृत्य लक्ष वेधून घेणारे होते.
अमरावतीच्या धर्मादाय कॉटन फंड येथे गत नऊ दिवसांपासून हे संमेलन सुरु आहे. देशभरातून ग्वालियर, दिल्ली, ईंदूर, द्रुर्ग, आग्रा, मुंबई, नागपूर, हैद्राबाद, बंगळुरू, अकोला यासह अनेक शहरातून साडेतीन हजाराच्यावर किन्नरांनी या संमेलनाचा हजेरी लावलेली आहे. या मेळाव्याला मंगलमुखी संमेलन असे नाव देण्यात आलेले आहे. सोमवारी सर्व किन्नरांनी धर्मदाय कॉटन फंडपासून अंबादेवीपर्यंत कलश यात्रा काढली. यात नाचत गाजत किन्नर हे देवीच्या दर्शनाला गेले. अंबादेवी व एकवीरा देवीच्या मंदिरात किन्नरांनी ओटी भरली तसेच कलश अर्पण केले.