जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर शहर सुधारित पाणी योजनेचा समावेश केंद्र शासनाच्या अमृत २.० योजनेमध्ये होऊन या कामासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून २० कोटी ७९ लक्ष रकमेच्या निधीस मंजुरी मिळाल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना उपनेते व शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे माणिकडोह धरणातून बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी जुन्नर शहरात आणून पाणी योजना राबविण्याकरता फेब्रुवारी २०२२ मध्ये १५ कोटी ७० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र सुधारित दरसूची व वाढलेला जीएसटी आदींमुळे या कामास नव्याने तांत्रिक मान्यता घेण्यात येऊन केंद्र पुरस्कृत अमृत २.० योजनेत या कामाचा समावेश व्हावा यासाठी राज्याचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नोव्हेंबर २०२२ मध्ये संपन्न झालेल्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीत प्रस्तावाची छाननी करण्यात आली होती. त्यानंतर शासन मान्यतेसाठी या कामाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
याबाबत माहिती देताना आढळराव पाटील म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी वसलेल्या जुन्नर शहरातील जनतेची पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी चांगल्या प्रकारची पाणी योजना मंजूर व्हावी यासाठी गेली तीन वर्षांपासून मी राज्य शासनाकडे पाठपुरावा करीत आलो आहे. त्यास यश येऊन या महत्त्वकांक्षी योजनेला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी खासबाब म्हणून मंजुरी देऊन निधी उपलब्ध केला आहे. विशेष म्हणजे माणिकडोह धरणातून सुमारे सात-आठ किलोमीटर लांबीची थेट पाईप लाईन घेण्यात येऊन त्याद्वारे शाश्वत पाणीपुरवठा स्त्रोत शहराला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पाणी गळती न होता पाण्याचा अपव्यय टळून बारमाही पाणी शहरातील नागरिकांना मिळणार आहे. ही योजना मार्गी लावल्याबद्दल महायुती सरकारचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यावेळी अभिनंदन व्यक्त केले.