चंद्रपूर २९ डिसेंबर - शहरातील पोस्ट / टेलीफोन पेटी, इलेक्ट्रिक खांब, रस्त्याच्या कडेची झाडे इत्यादींवर विना परवानगी भिंतीपत्रके लावलेल्या युनिक अकॅडेमी विरुद्ध चंद्रपूर महानगरपालिका झोन क्र. २ कार्यालयाद्वारे पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर अकॅडेमीद्वारे UPSC/MPSC वर मोफत सेमिनार बाबत शहरात जागोजागी भिंतीपत्रके लावण्यात आली आहेत. मात्र याकरीता कुठलीही परवानगी अकॅडेमीद्वारे मनपाकडून घेण्यात न आल्याने सदर संस्थेविरुद्ध महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण कायदा- १९९५' अंतर्गत तात्काळ कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रपूर महापालिकेच्यावतीने शहरात सुशोभिकरणांतर्गत विविध थीमद्वारे राज्यस्तरीय स्पर्धा नुकतीच घेण्यात आली तसेच स्वच्छतेसंबंधी विशेष मोहीम मनपाद्वारे राबविण्यात येत आहे. रंगरंगोटीद्वारे संपूर्ण शहर सुशोभित होत असताना भिंतीपत्रके लावून शहर विद्रुप करण्याचा प्रयत्नांविरुद्ध मनपाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
भिंतीपत्रके,पोस्टर्स,बॅनरबाजीमुळे शहराच्या विद्रुपीकरणासह शहराच्या सौंदर्यात बाधा येते किंबहुना वाहतुकीसही अडथळा निर्माण होत असल्याने याबाबत उच्च न्यायालय आणि राज्य शासनाने आखुन दिलेल्या सुचनांनुसार कारवाई करण्यात येते. त्यानुसार, परवानगीशिवाय पॅम्प्लेट्स, बॅनर्स, होर्डिंग्ज,कापडी फलक लावणा-यांवर आर्थिक दंडासह कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद या धोरणामध्ये करण्यात आली आहे. शहरातील रस्ते, दुभाजक तसेच चौकात अनधिकृतपणे जाहिरात फलक, बोर्ड, बॅनर्स, स्टिकर तसेच भिंतीपत्रके लावून शहर विद्रुप करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण कायदा- १९९५' अंतर्गत तात्काळ कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्त विपीन पालीवाल यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.