Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, डिसेंबर १८, २०२२

सुधीरभाऊंच्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या वन विभागाचे नावलौकिक | forest maharashtra chief minister

MAHARASHTRA FOREST DEPARTMENT


 सुधीरभाऊंच्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या वन विभागाचे नावलौकिक

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Ø सुधीरभाऊंनी पाहिलेले स्वप्न ते पुन्हा वनमंत्री असताना साकार झाले

-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ø नागपूरचे 'वनभवन' आपल्या सर्वांसाठी 'समाधानाचे भवन' व्हावे  

-सुधीर मुनगंटीवार

Ø नागपूर येथे वन भवनाचे थाटात लोकार्पण

नागपूर : मंत्र्याकडे कोणतेही खाते असले तरी त्यांची तळमळ, समर्पणभाव आणि काम करण्याची जीद्द यातून त्या खात्याची ओळख होत असते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार यांनी वन खात्याची धुरा सांभाळली. त्यांनी केलेल्या कार्यामुळेच महाराष्ट्राच्या वनखात्याला देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर नावलौकिक मिळाले, असे गौरवोद‌्‌गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. निमित्त होते नागपूर येथे वन भवनाच्या लोकार्पण सोहळ्याचे.

कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, मुख्य वनबल प्रमुख वाय.एल.पी.राव, आमदार आशिष जयस्वाल, आमदार देवराव होळी, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकुद्दे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

आपल्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी ही विकासाच्या रथाची दोन चाके व्यवस्थित चालतील, असे काम मुनगंटीवार यांनी केल्याचे सांगितले. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात कोट्यवधींचा वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. वन्यजीव आणि वनक्षेत्रात वाढ झाली. अगोदरच्या पाच वर्षांत वन विभागात सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले काम जगाचे लक्ष वेधणारे आहे. केवळ वृक्षारोपणापर्यंतच ही जनचळवळ थांबली नाही, तर वृक्षांचा वाढदिवसही साजरा केला जाऊ लागला. कार्यकुशलता आणि वक्तृत्व या दोन्ही गोष्टी मुनगंटीवार यांना दैवी देणगी असल्याचे ते म्हणाले.

बदलत्या हवामानामुळे ‘ग्लोबल वॉर्मिंग’ची मोठी समस्या आपाल्यापुढे आहे. वेळीअवेळी अतिवृष्टी होते. त्यातून मोठी हानी होते. अशात पर्यावरण संतुलनाची मोठे आव्हान वन विभागापुढे आहे. आता महाराष्ट्रात ‘अर्बन फॉरेस्ट’चेही काम सुरू झाले आहे. त्यातून शहरी भागात प्राणवायूचे प्रमाण निश्चित वाढेल. प्राणवायू किती मोलाचा असतो, हे कोविड महासाथीने सर्वांना शिकविले. पर्यावरण आणि वन्यजीवांची काळजी घेतल्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या पूर्वी सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री असताना त्यांनी वनविभागाच्या जुन्या कार्यालयाचा कायापालट करून नवीन सुसज्ज इमारत उभारण्याचे स्वप्न पाहिले. यावेळी सुधीरभाऊ वनमंत्री झाल्यावर ते स्वप्न पूर्णत्वास आले.वन भवनाचे लोकार्पण होणे हा आनंदाचा क्षण आहे. नागपुरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेले वन विभागाचे सर्व कार्यालय यामुळे एकाच छताखाली आले आहेत. देशातील वनविभागांपैकी महाराष्ट्रातील वनविभाग एकमेव असा विभाग आहे ज्याने वनक्षेत्रात वाढ केली आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आहे.

समाधान भवन व्हावे!

आपल्या भाषणात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, देशाचे मध्यवर्ती, झिरो माईलचे ठिकाण असलेल्या नागपुरातील 'वन भवन' हे खऱ्या अर्थाने 'समाधान भवन' व्हावे. जगातील १४ देशांमध्ये वाघ आहे. त्यातील सर्वाधिक वाघ भारतात आहेत. भारताचे ‘टायगर कॅपिटल’ म्हणुन नागपूरची जगभरात ओळख आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही ठाण्याचे वाघ म्हणून ओळखल्या जातात. ‘टायगर कॅपिटल’मध्ये ठाण्याच्या ढाण्या वाघाचे स्वागत करताना आनंद होत असल्याचा आगळावेगळा उल्लेख मुनगंटीवार यांनी करताच सभागृहात टाळ्यांच्या कडकडाट झाला. मुख्यमंत्र्यांसाठी 'वन' हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. जेंव्हा आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला तेंव्हा स्वतः एकनाथ शिंदेजी यांनी कोणाचाही मदत न घेता एक लाख वृक्ष लावले होते.

शास्त्र सांगते की, जो मुक्या जीवांची भाषा ऐकतो, त्याची भाषा देवही ऐकत असतो. त्यामुळे वन्यजीव संवर्धनाची जबाबदारी आपली सर्वांची आहे. वन भवनाची ईमारत ‘जी फाइव्ह’ आहे. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जी ट्वेन्टी’चे अध्यक्षपद स्वीकारताना त्यातील महत्त्वाचा विषय पर्यावरण आणि पर्यावरणीय बदल असल्याचे नमूद केले. आईची सेवा आणि वनराईची सेवा ही अतिशय मूल्यवान असल्याचे मुनगंटीवार यांनी नमूद केले.

पर्यावरणातील वाढते प्रदूषण हा चिंता आणि चिंतनाचा विषय आहे. यावर मोठे विचारमंथन होत आहे. 2000 ते 2022 पर्यंत जगात प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. प्रदूषणात 300 टक्क्यांनी वाढ झाली आहे. माणूस स्वत:च्या आरोग्याची काळजी करतो; परंतु पृथ्वी आणि पर्यावरणाच्या आरोग्य संतुलनाची काळजी करीत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. वन आणि जीवन ह्याचा शब्दशः जवळचा संबंध आहे. जीवनाचा 'जी' हा वनाशी खूप जवळचा आहे. नागपूर हे देशाच्या हृदयस्थानी आहे, देशाचा झिरो माईल बिंदू इथे आहे, अशा देशाच्या हृदयस्थानी वन विभागाचं कार्यालय आहे. जसं मनुष्याच्या हृदयाचं कार्य असतं की अशुद्ध रक्त शुद्ध करणे, या कार्यालयात देखील हेच कार्य आहे. जी जी पर्यावरणात म्हणून अशुद्धता असेल, ती ती अशुद्धता शुद्ध करणे हेच काम या कार्यालयाचे आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या नावातील एस आणि फडणवीस यांच्या नावातील एफ असे सुपरफास्ट सरकार महाराष्ट्राला मिळाले आहे. त्यात पुन्हा 'एकनाथ' जींच्या नावातील ई हा इकॉनॉमिक आणि 'देवेंद्र' जींच्या नावातील 'डी' हा डेव्हलपमेंटचा आहे त्यामुळे सुपर फास्ट इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा ही राज्यात सुरू आहे. वन विभागानेही या परिस्थितीचा फायदा करून घ्यावा, असे मुनगंटीवार म्हणाले.

माणूस जन्माला येतो त्या लाकडी पाळण्यापासून तर सरणाच्या लाकडापर्यंत आपण सर्व काही पर्यावरणाकडुन घेतो. पर्यावरणाकडुन आपण घेतोय, पण त्याची परतफेडही केली पाहिजे, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले. यादरम्यान उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील वन अधिकारी, कर्मचारी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सुवर्ण, रजत पदकांनी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.

00000

वृत्त क्र. 1075

‘वन भवन’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर, दि. 18 : ‘वन भवन’ या वन विभागाच्या नुतन प्रशासकीय इमारतीचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

वन विभागाचे सुसज्ज कार्यालये या इमारतीत सुरु करण्यात येत असून नव्या इमारतीत हा सोहळा पार पडला. मुख्यमंत्र्यांच्या आगमन प्रसंगी वनमंत्री मुनगंटीवार यांनी वृक्ष रोप देऊन मुख्यमंत्र्यांचे व उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्यानंतर इमारतीजवळच्या सेल्फी पॉईंटवर तिघा मान्यवरांनी आपले छायाचित्र घेतले. व्याघ्रसंरक्षण दलाने मान्यवरांना मानवंदना दिली. त्यानंतर फित कापून व कोनशीला अनावरण करुन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्याचा वनविभाग हा देशात सर्वोत्कृष्ट काम करणारा विभाग आहे. राज्यात वनक्षेत्राचा लक्षणीय विस्तार करण्याचे काम या विभागाने केले आहे. या नूतन इमारतीत वन विभागाची सर्व प्रमुख कार्यालये एकाच छताखाली आल्याने प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने सोय झाली आहे.

या कार्यक्रमास लोकसभा सदस्य खा.कृपाल तुमाने, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती मुक्ता कोक्कड्डे विधानसभा सदस्य आ. ॲड.आशीष जयस्वाल, वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणू गोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. वाय. एल. पी. राव, नागपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, उप वनसंरक्षक डॉ भारतसिंह हाडा आदी उपस्थित होते.

असे आहे ‘वन भवन’

ही इमारत नागपूर शहराच्या सिव्हिल लाईन्स भागात 5625.00 चौ मी क्षेत्रफळ जागेवर स्थित आहे. इमारतीचे बांधकाम याप्रमाणे- तळमजला-1697.72चौ मी,पहिला मजला -1548.15 चौ मी., दुसरा मजला-967.77 चौ मी, तिसरा मजला 967.77 चौ मी. असे एकूण 5181.19 चौ मी बांधकाम आहे. या कामासाठी आतापर्यंत 26 कोटी 5 लक्ष 40 हजार रुपये निधी खर्च झाला आहे.ही सुसज्ज इमारत अत्यंत देखणी असून सर्व सोयीने युक्त आहे.या एकाच इमारतीत वन विभागाची 20 कार्यालये स्थापित आहेत.याशिवाय महिला कर्मचारी विश्राम कक्ष, वाहन चालक विश्राम कक्ष, उपहार गृह, संगणक नियंत्रण कक्ष इ सुविधा या इमारतीत स्थापित करण्यात आल्या आहेत. इमारतीच्या अंतर्गत सजावटीत वन्यजीवांची छायाचित्रे, पेंटींग्ज इ. सुरेख वापर करण्यात आला आहे. या शिवाय वनांच्या संवर्धनासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्रही दर्शनी भागात लावण्यात आले आहे.

मुख्यमंत्री शिंदेंनी केले मुनगंटीवारांचे कौतुक:

"सुधीरभाऊ म्हणजे तळमळ, आत्मीयता, संवेदनशील  आणि दूरदृष्टी असणारा मंत्री; त्यांच्यासारखे सहकारी मंत्रीमंडळात आहेत त्यामुळेच सुपरफास्ट कामं करू शकतोय" असे कौतुकोद्गार मा.मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांनी आपल्या भाषणादरम्यान काढले.



 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.