शासकीय औ. प्र. संस्थेत अल्पसंख्यांक बेरोजगार उमेदवारांसाठी अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रमाची सुरुवात
गडचिरोली (प्रतिनिधी) -
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे शासनाच्या वतीने अल्पसंख्यांक समाजातील बेरोजगार युवक युवतींसाठी अल्पमुदतीचे रोजगारक्षम व्यावसायिक अभ्यासक्रमाची सुरुवात येत्या १५ नोव्हेंबरपासून होत आहे, तरी या सुवर्णसंधीचा लाभ अल्पसंख्यांक समाजातील मुस्लिम, शीख, जैन, पारशी, बुद्धिस्ट आणि ख्रिश्चन उमेदवारांनी घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे . सुरुवातीला एकूण चार अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असून याकरिता उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते ४० असे आहे. सेल्फ एम्प्लॉईड टेलर्स या अभ्यासक्रमासाठी प्रवेश पात्रता किमान इयत्ता आठवा वर्ग उत्तीर्ण असा आहे. तर ब्युटी थेरपीस्ट या अभ्यासक्रमात प्रवेशासाठी किमान दहावी पास असणे गरजेचे आहे. वरील दोन्ही अभ्यासक्रम फक्त मुलींसाठी असून प्रत्येक व्यवसायातील प्रवेश क्षमता ३० आहे.
प्लंबर जनरल या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी किमान आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर डोमेस्टिक डाटा एन्ट्री ऑपरेटर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यवसायासाठी तीस जागा उपलब्ध असून किमान तीन महिन्याचा हा अभ्यासक्रम असणार आहे. प्रवेश घेण्यासाठी कुठल्याही मूळ प्रमाणपत्राची आवश्यकता नसून फक्त गुणपत्रिकेची झेरॉक्स, टीसी ची झेरॉक्स ,आधार कार्ड ची झेरॉक्स, अल्पसंख्यांक असल्याचा पुरावा तसेच दोन फोटो आवश्यक असून या सुवर्णसंधीचा लाभ बेरोजगार युवकांनी निश्चितपणे घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके यांनी केलेले आहे.
अधिक माहितीसाठी आणि नोंदणी करण्यासाठी संस्थेतील निदेशक विजय शेंडे (9373459937) व सतीश भरडकर ( 9404119677) यांचेशी त्वरित संपर्क साधावा. नवयुवकांनी अल्प मुदतीचे व्यवसाय कौशल्य संपादन करून घेतलेल्या प्रशिक्षणाचा व्यवसायानुरूप कृती करणे आणि त्या अनुभवाचा स्वतःसह समाजासाठी उपयोग व्हावा या दृष्टीने या अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे . या माध्यमातून सहज रोजगार उपलब्ध होऊ शकेल तसेच जीवन शिक्षणाचा संबंध जोडून अनुभवाच्या आधारावर जीवनाला नवी दिशा देण्याचे या अभ्यासक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
Initiation of short term employable courses for minority unemployed candidates