*3 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान उपक्रमाचे आयोजन*
जिल्हा प्रतिनिधी(चंद्रपुर) दि 7/11/2022 दिनांक 19 नोव्हेंबर या जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत जिल्ह्यातील गावे सतत हागणदारीमुक्त राहावी हे ध्येय पुढे ठेवून दिनांक 3 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना राज्यस्तरावरून प्राप्त झाल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत असून या बाबत सुचना सबंधीत यंत्रणेला देण्यात आल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरणकुमार धनवाडे यांनी दिली.
19 नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिवस हा सर्वत्र राबविला जातो. त्यानिमित्ताने वर्धा जिल्ह्यात 3 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीमध्ये जागर स्वच्छतेचा ही विशेष मोहीम राबविल्या जाणार आहे. यादरम्यान जिल्हा व तालुकास्तरीय बैठका,वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन द्वारे प्राप्त अर्जावर कार्यवाही करणे, प्रलंबित वैयक्तिक शौचालय बांधकाम प्रोत्साहन पर अनुदान वितरित करणे, एक खड्डा शौचालयाचे रूपांतर दोन खड्डा शौचालय मध्ये करणे, 500 हून कमी लोकसंख्या असलेल्या गावात सेप्टिक टॅंक शौचालयाचे मैला गाळ व्यवस्थापनासाठी चर उपलब्ध करून देणे, जिल्ह्यातील 10 किलोमीटर परिसरातील 500 हून अधिक लोकसंख्या असलेल्या गावाना नागरी मैला गाळ व्यवस्थापण सुविधेबाबत जोडण्यासाठी नियोजन करणे, सार्वजनिक शौचालय देखभाल, बांधकाम, दुरुस्ती आणि नियमित वापर ही कामे मोहीम स्वरूपात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मोहीम कालावधीत सदरचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने जिल्हा व तालुकास्तरीय बैठकांचे आयोजन करने, संबंधित विविध स्वयंसेवी संस्था शासकीय विभागांचा सक्रिय सहभाग, आदी उपक्रमाद्वारे गावागावात जनजागृती करण्यात येणार आहे.
*स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत स्वच्छतेचा जागर करून उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या अनुषंगाने सर्व अधिकारी कर्मचारी यांना सूचना देताना जिल्ह्यातील सर्व गावांनी विशेषतः सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी या मोहिमेमध्ये सहभागी होऊन ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ,पाणी व स्वच्छ्ता किरणकुमार धनवाडे यांनी केले आहे.*