ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही कमी नाही; त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज : पो. निरीक्षक योगेश घारे
सिंदेवाही पो. स्टेशन येथे मातोश्री अकॅडमी तर्फे 'मार्गदर्शन शिबिर'
सिंदेवाही | सरकारी नोकरी हे प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. आज ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेत रुजू झालेले आहे. मात्र या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी, शिकवणी वर्ग लावण्यासाठी शहरात जावे लागते. परंतु काही विद्यार्थी गुणवत्ता असून पैशाअभावी जाऊ शकत नाही. अशांना जर त्यांच्या तालुक्यातच मार्गदर्शन मिळाले तर ते कुठेही कमी पडणार नाहीत. त्यांना केवळ योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचे प्रतिपादन सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश घारे यांनी केले. शुक्रवारी (ता.१४) मातोश्री करियर अकॅडमी तर्फे सिंदेवाही पोलीस स्टेशनच्या आवारात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मार्गदर्शन शिबिराचा लाभ तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी घेतला.
याप्रसंगी मंचावर तहसीलदार गणेश जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक महल्ले साहेब, तालुका कृषी अधिकारी अनिल महाले, कृषी सहाय्यक राम कणखर, मातोश्री करियर अकॅडमीचे संचालक अनिल बोरकर, प्रा. बेलोरकर आदी उपस्थित होते.
योगेश घारे पुढे म्हणाले, सिंदेवाही सारख्या तालुक्यात स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करण्यासाठी मातोश्री करियर अकॅडमी सुरू झाली ही येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बाब आहे. आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल व पुढे आपल्या तालुक्यातील अनेक मुलं-मुली शासकीय सेवेत जातील, असा विश्वास योगेश घारे यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांनी आपल्या जीवनातील अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले व स्पर्धा परिक्षेबद्दल मार्गदर्शन केले.
तालुका कृषी अधिकारी अनिल महाले यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करताना येणाऱ्या अडथळ्यांबद्दल मार्गदर्शन केले. तसेच आपले उद्दिष्ट ठरवून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा, उद्दिष्टांपासून आपले लक्ष विचलित होऊ देऊ नका. यश नक्की मिळेल, असे प्रेरणादायी उद्बोधन यावेळी महाले यांनी केले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक महल्ले यांनी अभ्यास करताना विद्यार्थ्यांना येणारे अपयश कसे पचवायचे याचा मूलमंत्र सांगितला. तसेच अनेक यशस्वी विद्यार्थ्यांचे उदाहरणे देऊन यश कसे संपादन करता येईल याविषयी माहिती दिली.
विद्यार्थ्यांनों तरुण उमेदीच्या वयात आपल्या भविष्याचा विचार करा. फॅशनकडे लक्ष न देता मला काय बनायचं आहे? याकडे लक्ष द्या आणि ध्येयप्राप्ती मिळेपर्यंत थांबू नका, असा सल्ला कृषी सहाय्यक राम कणखर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. सीताबाई शेंडे कॉलेज मधील प्राध्यापक बेलोकर यांनी स्पर्धा परीक्षा आणि सद्य परिस्थिती यावर मार्गदर्शन करून पुढे कशी वाटचाल करावी याबद्दल माहिती दिली.
'मार्गदर्शन आमचे प्रयत्न तुमचे' : अनिल बोरकर
पैशाअभावी ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी गुणवत्ता असूनही शिक्षण घेऊ शकत नाही. आशा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देण्याच्या हेतूने सिंदेवाही तालुक्यात मातोश्री करियर अकॅडमी सुरू करण्यात आली असल्याचे संचालक अनिल बोरकर यांनी सांगितले. योग्य मार्गदर्शन आणि इमानदारीने केलेले प्रयत्न कधीच वाया जात नाही. केलेल्या प्रयत्नांना यश नक्की मिळतो. त्यामुळे प्रयत्न करणे कधीही सोडू नका. अपयशातून अनेक अनुभव येतात आणि पुढे हेच अनुभव यशाचा मार्ग मोकळा करून देण्यास मदत करतात. त्यामुळे खचून जाऊन थांबू नका, असा सल्ला यावेळी अनिल बोरकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अकॅडमीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक अनिल बोरकर यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे संचालन नाट्य कलाकार लालू पेंदाम यांनी तर आभार मातोश्री करियर अकॅडमीचे संचालक अनिल बोरकर यांनी केले.