विदर्भातील गरीब जनतेला सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपचार सेवा आणि आरोग्य निगडित सोईसुविधा मिळाव्या यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून याच प्रयत्नातून एम्स नागपूरची स्थापना झालेली आहे- अवयव प्रत्यारोपणाची अत्याधुनिक सुविधा एम्स मधे उपलब्ध व्हावी- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नागपूर/15/10/2022
नागपूरच्या मिहान येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था - एम्सच्या फिजीओलॉजी ( शरीरविज्ञान) विभागाद्वारे 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान ' असोसिएशन ऑफ फिजीओलॉजिस्ट ऑफ इंडिया - असोपीआय ' या संघटनेद्वारे आठव्या ‘असोपीकॉन -2022 ’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन आज दिनांक १५ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. या प्रसंगी बोलतांना त्यांनी सांगितले,
विदर्भातील गरीब जनतेला सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपचार सेवा आणि आरोग्य निगडित सोईसुविधा मिळाव्या यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून याच प्रयत्नातून एम्स नागपूरची स्थापना झालेली आहे. नागपूरला संलग्नित राज्य सुद्धा उपचार सेवेसाठी नागपूर येथील आरोग्य सेवेवर अवलंबून आहेत. नागपूर मधे सरकारी क्षेत्रासह खाजगी क्षेत्रे सुध्दा उपचार सुविधा पुरवीत आहे. थॅलेसिमिया, सिकलसेल,बोन मॅरो यासारख्या आजारासाठी एम्स नागपूर मधे निदान व्हावे आणि याचा लाभ विदर्भातील जनतेला व्हावा यासाठी एम्स नागपूर आग्रही असायला हवे.
यकृत, हृदय, किडनी प्रत्यारोपणाची सुविधा एम्स नागपूर मधे उपलब्ध होऊन अवयव प्रत्यारोपण संबधी जनजागृती होणे आवश्यक आहे. या विषयावर विस्तृत संशोधन आणि उत्तम यंत्रणा स्थापित होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉक्टरांची कमतरता हा एक गंभीर विषय असून देशात वैद्यकीय महविद्यालयाची संख्या वाढली तर या समस्येला आटोक्यात आणता येईल.मागास क्षेत्रात आरोग्य सुविधा पुरविणे गरजेचे असून गरीब जनतेला माफक दरात ह्या अत्याधुनिक सेवा मिळायला हव्यात असे प्रतिपादन त्यांनी केले.
उत्कृष्ट उपचार सेवेसाठी नागपूर एम्स सदैव आग्रही असून या परिषदेचा पुरेपूर फायदा विद्यार्थी,तज्ञ यांना होईल अशी आशा एम्स नागपूरच्या संचालिका मेज.जनरल विभा दत्ता यांनी व्यक्त केली.
परिषदेला रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री.कृपाल तुमाने, एम्स पटनाचे कार्यकारी संचालक श्री.जी.के.पाल, किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजचे मुख्य प्राचार्य श्री. नरसिंग वर्मा आणि विविध मान्यवर यांची उपस्थिती होती.