Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी ११, २०११

सातवाहनकालीन गुंफांचे अस्तित्व धोक्‍यात

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, January 11, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: chandrapur, vidarbha
चंद्रपूर - प्राचीन मानवी संस्कृतीचा उत्कृष्ट नमुना असलेल्या सातवाहनकालीन गुंफा काळाच्या उदरात गडप होण्याच्या मार्गावर आहेत. नागभीड तालुक्‍यातील मोहाळी कुनघाडा गावापासून दोन किलोमीटरवरील या गुंफा शेवटच्या घटका मोजत आहेत. याला परिसरात "पांडव गुंफा' या नावाने ओळखले जाते.
या गुंफा सातवाहनकाळात तयार करण्यात आल्याचे पुरावे आहेत. या गुंफाच्या शृंखलेत पाच गुंफा आहेत. त्यामुळे याला "पांडव गुंफा' या नावानेसुद्धा ओळखले जाते. या पाच गुंफांमधील एका गुंफेत ब्राम्हीलिपीत शिलालेख लिहिला आहे; ज्यामुळे ही गुंफा सातवाहनकाळातील असल्याचे स्पष्ट होते. त्या शिलालेखाचे अस्तित्व आता नामशेष झाले आहे. गावकऱ्यांनी या गुंफांना स्वच्छ करून त्यावर चुन्याचा लेप लावला आहे. मात्र, आज या गुंफांची अवस्था मोडकळीला आली आहे. एकेकाळी याचा उपयोग बौद्ध धर्मातील हिनयान पंथाचे लोक करीत होते. बौद्ध धर्मातील भिक्‍खू या गुंफांचा उपयोग पावसापासून बचाव करण्यासाठी करीत. आज हे ठिकाण जनावरांचे आश्रयस्थान झाले आहे.
या गुंफांमध्ये कोणत्याही प्रकारच्या मूर्ती नाहीत. त्या कुठल्याही प्रकारे अलंकृत नाहीत. या गुंफांना "शैलाक्षय' (निवासाचे ठिकाण) या नावानेही ओळखले जाते. या पाच गुंफांमध्ये दोन गुंफांच्या समोर वरांडे आहेत. तीन गुंफांत फक्त कक्ष आहेत. त्यांचा आकार दोन मीटर लांब आणि तीन मीटर रुंद आणि दोन फूट उंच असा आहे.





भारतात जवळपास 1200 गुंफा आहेत. त्यातील एक हजार महाराष्ट्रात आहेत. राज्यातील अंजता, एलोरा, एलिफंटा, कार्ला, भाजा या सोडून उर्वरित सर्व दुर्लक्षित आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात सात गुंफा समूह आणि 15 वेगवेगळ्या गुंफा आहेत. मात्र, भद्रावती येथील विजासन गुंफांचा अपवाद वगळता अन्य एकही गुंफा पुरातत्त्व विभागाच्या संरक्षण सूचीत नाही. त्यामुळे चंद्रपूर नगरपालिकेच्या हद्दीतील लालपेठ कॉलरीजवळील माना गुंफांचा समूह नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यातील बहुतांश गुंफा ऊन, पाऊस यासोबत जनावरे आणि मानवांकडून होणारी हानी सहन करीत आहेत.


""मानवी संस्कृतीच्या या ठेव्याचे जतन केले नाही, तर त्या नष्ट होतील. इतिहासामध्ये केवळ यांच्या आठवणी राहतील. ''

- अशोकसिंग ठाकूर इतिहास संशोधक

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.