जुन्नर /आनंद कांबळे
माळशेज घाटात खिरेश्वर (ता.जुन्नर) व थितबी (ता.मुरबाड) यादरम्यान कोसळणाऱ्या काळू धबधब्यात वाहून चाललेल्या मुंबईच्या दोन पर्यटकांना वाचविण्यात येथील शिवनेरी ट्रेकर्सच्या सदस्यांना नुकतेच यश आले.
सुट्ट्यांच्या दिवशी काळू धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होते. या ठिकाणी अपघातही नित्याचे झाले आहेत. नुकताच मुंबईतील एका तरुणाचा या धबधब्यात पडून मृत्यू झाला. घटनास्थळावरून बऱ्याच अंतरावर काळू नदीच्या पात्रात त्याचा मृतदेह सापडला. या घटनेला चार दिवस उलटायच्या आतच हा प्रकार निदर्शनास आल्याने पावसाळी पर्यटनातील पर्यटकांचा बेजबाबदारपणा आणि पर्यटकांच्या सुरक्षेच्या अनुशंगाने शासकीय यंत्रणांची उदासिनता चव्हाट्यावर आली आहे.
३१ जुलै २०२२ रोजी शिवनेरी ट्रेकर्सचे सदस्य व मंगरूळ पारगाव येथील रहिवासी सागर चव्हाण, अतुल रसाळ, स्वप्नील तट्टू हे या काळू धबधब्याच्या परिसरात सेफ्टी केबल लावण्याच्या अनुषंगाने सर्वेक्षण करण्यासाठी गेले होते.काळू धबधब्याचे ३ प्रमुख टप्पे आहेत.यातील सर्वात खालच्या टप्प्यात रविवारी दुपारी सुमारे ५० पर्यटक पावसाळी सहलीला आले होते. यापैकी २० ते २५ वयोगटाच्या ४ तरूणी व १ तरूण हे धोकादायक पद्धतीने पाणाच्या मुख्य प्रवाहात उतरले होते.
या ठिकाणी सुरक्षात्मिक बाबींच्या अनुषंगाने पहाणीस गेलेल्या शिवनेरी ट्रेकर्सच्या या पथकाने त्यांना वारंवार गांभिर्याचा इशारा देवूनही त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. पाण्यातील शेवाळल्या दगडावरून पाय घसरून त्यातील एक तरुण व एक तरुणी वाहून जाऊ लागले. त्यांनी वाहताना आरडाओरडा केला. यावेळी प्रसंगावधान दाखवत शिवनेरी ट्रेकर्सचे सदस्य सागर चव्हाण, अतुल रसाळ व स्वप्नील तट्टू यांनी या दोघांना धबधब्यात पाणी कोसळण्याच्या जागेपासून अवघ्या काही फुटांवर सुरक्षितपणे बाहेर काढले.
विशेष म्हणजे पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या दोघांना ज्या ठिकाणी शिवनेरी ट्रेकर्सच्या सदस्यांनी पकडलं त्या ठिकाणापासून अवघ्या १० फुटांवर काळू धबधबा कोसळत होता.या तरुणांनी प्रसंगावधान राखून जर त्यांना लगेच पकडलं नसतं तर वाहून जाणारे मुलगा व मुलगी थेट या धबधब्यात कोसळून खोल दरीत गेले असते.