घुग्गूस शहरातील निर्माणाधीन उड्डाणपुलाचे बांधकाम प्राधान्याने पूर्ण करावे- मंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर, दि. 21 ऑगस्ट: घुग्गूस हे औद्योगिक शहर असून या शहराची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. घुग्गूस शहरातील रेल्वे गेटवर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे, रेल्वे क्रॉसिंगमुळे होणारी वाहतूक कोंडी व ओव्हरलोडिंग वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था असणे गरजेचे आहे. त्यासाठी येथील निर्माणाधीन उड्डाणपुलाचे बांधकाम प्राधान्याने पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
घुग्गूस येथील निर्माणाधीन उड्डाणपूल, घुग्गूस वळण मार्ग व रेल्वे क्रॉसिंगवरील वाहतूक समस्याबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी देवराव भोगंळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार निलेश गौंड, घुग्गूसचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, पोलीस निरीक्षक बबन फसाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कुंभे,उपविभागीय अभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, मध्य रेल्वेचे वरिष्ठ शाखा अभियंता निखिल आकूलवार प्रामुख्याने उपस्थित होते.
घुग्गूस हे औद्योगिक शहर असून या शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे येथे वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पर्यायी उपाययोजना करणे गरजेचे आहे. असे सांगून मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जड वाहतुकीसाठी 2200 मीटर लांबीच्या नवीन बायपास रोडची निर्मिती करण्यात येणार आहे. वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी उड्डाणपुलाची निर्मिती हे कायमस्वरूपी उपाय आहे. लॉयड मेटल्स, एसीसी सिमेंट आदी कंपन्याच्या जड वाहतूकीकरीता पर्यायी रस्त्याची निवड करण्याचे निर्देश दिले. तसेच जड वाहतुकीसाठी बायपास रोड तयार करावेत. रेल्वे गेट आणि रस्त्याचे रुंदीकरण करावे. वे-ब्रिज रेल्वे गेटवरून दुसरीकडे स्थलांतरित करावे. तसेच जेव्हा ओव्हरलोडींग होते अथवा डबल इंजिन लावल्या जाते या कामांमध्ये खूप वेळ लागतो, त्यामुळे रेल्वे गेट खूप वेळ बंद असते यावर उपविभागीय अधिकारी, रेल्वे अधिकारी व डब्लूसीएलने संयुक्त बैठक घेत सकारात्मक मार्ग काढण्यासाठी उपाययोजना करण्याचे सांगितले.
श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, रस्त्याची डागडुजी, व रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम कंत्राटदाराकडून तातडीने करून घ्यावे. चंद्रपूर बायपास रोडची भूसंपादन प्रक्रिया प्रलंबित आहे, ती प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी. जोपर्यंत फ्लाय ओव्हर ब्रिज तयार होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या रेल्वे गेटची उभारणी करावी. त्या ठिकाणी चार सुरक्षारक्षक तैनात करावे. रस्त्यावर बोर्ड लावून बॅरियर लावावेत जेणेकरून चुकीच्या मार्गाने वाहने टाकणार नाही. त्या ठिकाणी ट्रॅाफिक पोलिसाची नियुक्ती करावी तसेच कोणतेही काम करतांना त्याचे आकलन करावे व विहित वेळेत काम पूर्णत्वास न्यावीत, अशा सूचना देखील त्यांनी उपस्थितांना दिल्या.
सदर बैठकीमध्ये, घुगुस येथे 2200 मीटर लांबीचे
नवीन बायपास निर्मितीकरीता 6.6 एकर शेत जमिनीचे एक्वेझेशन होणार आहे. सर्वे करतांना त्याचे फायदे नागरिकांना समजावून सांगावे.तसेच नवीन बायपास निर्मितीची कार्यवाही त्वरीत पूर्ण करण्यात येईल. रेल्वे क्रॉसिंगमुळे वाहतूक कोंडी निर्माण होते त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात मानव संचालित गेट उभारून दुचाकी व लहान चारचाकी वाहनासाठी गेट उभारण्याचे नियोजित आहे. यासंदर्भात डीआरएम सोबत बैठक घेण्यात येणार असल्याचेही सांगितले. एसीसी व लॉयड मेटल कंपन्यामार्फत होणारी जड वाहतूक गावाच्या बाहेरून पर्यायी रस्त्याने करण्याचे निर्देश यावेळी दिले. तसेच जड वाहतुकीकरिता पर्यायी मार्गाचे नोटिफिकेशन पोलीस विभागामार्फत करण्यात येत असल्याचेही यावेळी सांगितले.
बैठकीला विवेक बोढे, बबलू सातपुते, प्रवीण सोनारी, राजेश मोरपाका, इबादूल सिद्दिकी, मानस सिंग आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
0000000