शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय चंद्रपूर येथील ६५ शिक्षकेतर पदांच्या निर्मितीचा प्रस्ताव त्वरीत निकाली काढ़ावा : आ. सुधीर मुनगंटीवार
त्वरित सकारात्मक कार्यवाही करण्याचे प्रधान सचिव श्री विकासचंद्र रस्तोगी यांचे आश्वासन
शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय चंद्रपूर येथे कमतरता असलेली शिक्षकेत्तर पदे नव्याने निर्माण करण्याची मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या मागणी संदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री विकासचंद्र रस्तोगी यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन श्री विकासचंद्र रस्तोगी यांनी दिले.
यावेळी झालेल्या चर्चेत आ. मुनगंटीवार म्हणाले , शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय चंद्रपूर या महाविद्यालयात १९९६ साली ३ शाखा सुरू करण्यात आल्या होत्या. या शाखेच्या अनुषंगाने ५५ शिक्षकेतर पदांची निर्मीती करण्यात आली होती. त्यानंतर २००७ या शैक्षणिक वर्षामध्ये संगणक विज्ञान व अभियांत्रीकी ही शाखा नव्याने सुरू करण्यात आली. तद्नंतर २०१० साली स्थापत्य अभियांत्रीकी व अनुविद्युत अभियांत्रीकी या दोन शाखा सुरू करण्यात आल्या. आजतागायत या सर्व ६ अभियांत्रीकी शाखा ५५ शिक्षकेतर कर्मचा-यांच्या मनुष्यबळावर सुरू आहे. तथापि नविन ३ शाखांकरिता एकाही शिक्षकेतर पदांची निर्मीती करण्यात आलेली नाही. अतिशय कमी शिक्षकेतर पदांमुळे कामाची पुर्तता व शैक्षणिक कामे बाधीत होत असुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या महाविद्यालयातील ब-याच कालावधी पासुन प्रलंबित असलेला ६५ शिक्षकेतर पदांच्या निर्मीतीचा प्रस्ताव तातडीने मंजुर करणे आवश्यक आहे, अशी भूमिका या चर्चेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली.
या महाविद्यालयातील ६५ शिक्षकेतर पदांच्या निर्मितीच्या प्रस्तावावर त्वरित सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल असे श्री विकासचंद्र रस्तोगी म्हणाले.