Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जुलै ०३, २०२२

देवेन्द्र... तुला सलाम |


मन सुन्न झालं... मेंदू बधीर झालाय… दुपारी १.३० वाजताच तुझ्याशी भेटलो. मनात अत्यंत आनंद होता पुन्हा एकदा आपला देवेंद्र या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार म्हणून. परंतू पत्रकार परिषद बघितली आणि लक्षात आलं काहीतरी भयानक घडतंय… किती सहजपणे तू एकनाथ शिंदेंची घोषणा केलीस..! तुझ्या सोबत असणाऱ्या लोकांनाही त्याचा तडाखा बसलेला जाणवत होता. त्यांनादेखील याची कल्पना नव्हती की तू मुख्यमंत्रीपद स्वत:हून सोडलेलं आहे. 

मागील अडीच वर्षांपासून तू भारतीय जनता पक्षाचा एकहाती किल्ला महाराष्ट्रात लढवत होतास. मग ‘पुन्हा येईन…’ वरून तुझी केलेली हेटाळणी… अमृतावरून तुझ्यावर तारतम्य सोडून गलिच्छ भाषेतील टिका टिप्पणी... शरीरावरून केलेली अर्वाच्च भाषा... अनेकदा तुला दिलेली भरगच्च शिविगाळ… शांतपणाने चेहऱ्यावरून कधीही काहीही न दाखवता तू सहन करत होतास. हे होत असताना तू मुख्यमंत्री नाहीस हे दाखवत देखील नव्हतास. पायाला भिंगरी असल्यासारखा वेड्यागत फिरत होतास. कोव्हिड काळात सन्माननीय माजी मुख्यमंत्री घरात बसले, परंतू तू मात्र आपलीच जबाबदारी असल्यासारखा वेड्यासारखा फिरत राहिलास. कोव्हिड झाल्यानंतर देखील तू सरकारी दवाखान्यात भरती होऊन उपचार घेतलास परंतू इतर सर्व मंत्री अनेक लाख रूपये देऊन खाजगी हॉस्पीटलमध्ये भरती झाले. हाच तुझ्या आणि त्यांच्यातला फरक सरळ सरळ दिसत होता. या तुझ्या फिरण्याला देखील नाव ठेवण्यात आलं. तुझ्यावर टिका टिप्पणी करण्यात आली. तू तसूभरही शांतता ढळू दिली नाही.

१० तारखेला राज्यसभेचा निकाल लागला. म्हटल्याप्रमाणे तू भारतीय जनता पक्षाची एक जास्त जागा निवडून आणली आणि विरोधकांना धक्का दिलास. पवारांसारखा माणूस देखील हतबल झाला, त्यांनीदेखील तुझी स्तुती केली. जे १० तारखेला झालं तेच पुन्हा विधानपरिषदेत... २० तारखेला. विधानपरिषदेमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाची एक जागा जास्तिची निवडून आली. ते बघून देखील सर्वांना धक्का बसला. संध्याकाळी, रात्री सर्वांसोबत होतास, मात्र महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा भूकंप घडतोय याची तुला कल्पना असून देखील तू चेहऱ्यावर दिसू दिलं नाही. केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीची सत्ता यावी यासाठी सुरू असलेल्या या धडपडीत तुझ्यावरचे संघाचे संस्कार दिसत होते. २१ जून पासून आजपर्यंत मागील पाच-सात दिवसात चेहऱ्यावरची शांतता ढळली नाही. संयम सुटला नाही. तू ज्या पद्धतीने काम करत होतास ते बघून निश्चितच आश्चर्य वाटतं. आम्हाला मात्र महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांना आनंद होत होता की, पुन्हा एकदा आमचा लाडका देवेंद्र हा या राज्याचा मुख्यमंत्री होणार.

पुन्हा एकदा अर्धवट पडलेली जलयुक्त शिवाराची योजना पूर्ण होणार… पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणामध्ये महाविकास आघाडीने घातलेला धिंगाणा तू मिटवणार… पुन्हा एकदा मराठा आरक्षण तू निश्चिंत करणार… पुन्हा एकदा वाझेसारखी चूक या महाराष्ट्रात घडणार नाही… पुन्हा एकदा तुझ्या रुपाने भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र होणार… ज्याची आम्ही वाट बघत होतो. आम्हाला आनंद होत होता, काल रात्री सरकार पडल्यानंतर… पण जाता जाता तुझ्यावर टोमणे मारले गेले. ते देखील आम्ही पाहत होतो. तू सुद्धा शांतपणे बघत होतास...

या सर्व काळामध्ये मागील अनेक वर्षांमध्ये तुझ्यासोबत राहत असताना अनेकांनी तुला शिव्यांची लाखोळी वाहिली. परंतू तुझ्या तोंडामध्ये त्या कार्यकर्त्याबद्दल, त्या नेत्याबद्दल कधी अप शब्दही बाहेर पडला नाही. अनेकदा निर्णय प्रक्रियेमध्ये तुझ्या मनाच्या विरुद्ध निर्णय झाला. मात्र तरी देखील त्या व्यक्तीला निवडून आणण्यासाठी तू केलेली पराकाष्टा, तू केलेले प्रयत्न, तू केलेली पैशांची तजवीज, हे देखील अत्यंत जवळून मी बघितलेलं आहे. मित्रा, आज जे घडलं ते बघून अक्षरश: धक्का बसला. माझ्यासारखे हजारो, लाखो कार्यकर्ते जे तुझ्यावर प्रेम करतात त्यांना प्रचंड धक्का बसला. स्वत:ला सहज मिळू शकणारी मुख्यमंत्र्याची खुर्ची तू दुसऱ्यासाठी पुढे केली. स्वत:ची मुख्यमंत्र्याची खुर्ची ज्याच्या पेक्षा तुझ्याअंगी पात्रता जास्त आहे अशा व्यक्तीसाठी तू स्वत:ची मुख्यमंत्री पदाची खुर्ची सहज सरकवली आणि हे असताना तुझ्या चेहऱ्यावर एक शिकंज देखील आम्ही बघितला नाही. मित्रा हे बळ कुठून आणलंस? म्हणूनच पार्टी विथ डिफरन्स भारतीय जनता पक्ष जर आज अनेक वर्ष टिकून आहे व तुझ्यासारख्यामुळेच वाढत आहे. 

आम्हाला नेहमीच अभिमान आहे की आम्हाला तुझा कार्यकर्ता म्हटले जाते. आम्हाला नेहमीच अभिमान असणार आहे की आम्हाला तुझा मित्र म्हणून ओळखलं जातं. पण मित्रा, हे सारं करणं हे तू आणि फक्त तूच जाणे… तूच हे करू शकतो. दुसरा कुणीही हे करण्याची हिंमत देखील दाखवू शकणार नाही. याबद्दल मला खात्री आहे. मित्रा, या तुझ्या धैर्याबद्दल, या तुझ्या ‘पक्ष प्रथम, नंतर मी’ हे वास्तवात उतरवल्याबद्दल मनपासून तुला मानाचा मुजरा करतो.

आत्ताच पुन्हा दुसरा धक्का बसला ,की केंद्रीय नेतृत्वाने तुला विनंती करून तुझी नेमणूक महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी केली. निश्चितच तू पक्षाचा आदेश शंभर टक्के पाळणार याची जाणीव आहे. परंतू पाच वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळल्यानंतर एका सहकाऱ्याच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करणं किती वेदनादायक असेल, पत्रकार परिषदेत मी मंत्रीमंडळाच्या बाहेर रहाणार हे घोषित केल्यावर पक्षश्रेष्ठींनी दिलेला आदेश पाळणे किती अवघड असेल हे समजणं कठीण आहे. परंतू केवळ आणि केवळ पक्षादेश म्हणून तू हे करणार आहेस नव्हे पुन्हा एकदा महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे पूर्ण बहुमत येण्याकरिता तू जीवाचे रान करणार यांत कुठलाच संदेह नाही. म्हणूनच ह्या महाराष्ट्रातील माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांचा तू प्रेरणास्थान व पॅावरस्टेशन आहेस.
म्हणूनच तूला दिल से सलाम

संदीप जोशी
माजी महापौर 
नागपूर.
Narendra Modi Amit Shah J.P.Nadda Devendra Fadnavis Nitin Gadkari Chandrakant Patil Chandrashekhar Bawankule Girish Mahajan Nitesh Rane Murlidhar Mohol Piyush Goyal Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra






SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.