सिंदेवाही तालुक्यात झाले होते चित्रपटाचे शूटिंग
- अनिल उट्टलवार , कलावंत
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही : विदर्भात लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी या नाटकांच्या खास प्रकारावरची धमाल आता ‘झालीवूड’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर बघता येणार आहे. बऱ्याच आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला हा चित्रपट नव्या दमाचा दिग्दर्शक तुशांत इंगळे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग सिंदेवाही तालुक्यात झाले आहे. हा चित्रपट ३ जून रोजी प्रदर्शित होत आहे. प्रियंका अग्रवाल, अंशुलिका दुबे,शाश्वत सिंग यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, अमित मसूरकर ड्यूक्स फार्मिंग चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.
तर न्यूटन, शेरणी, सुलेमानी किडा अशा दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले अमित मसूरकर या चित्रपटाचे निर्माते आहेत.
चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग सिंदेवाही तालुक्यात झाले आहे. चित्रपटाचे कलावंत झाडीपट्टी रंगभूमीतील अनिल उटलवार, काजल रंगारी, अजित खोबरागडे, अश्विनी लाडेकर, आसावरी नायडू, निशा घोंगडे आहेत.विदर्भात लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी नाटकाविषयी महाराष्ट्रात विशेष माहिती नाही. मात्र, झाडीपट्टी रंगभूमी हा अतिशय खास कलाप्रकार तर आहेच, पण झाडीपट्टी ही जणू वडसामधील इंडस्ट्रीज आहे. त्यामुळे ‘झालीवूड’ मधून पहिल्यांदा झाडीपट्टी रंगभूमी चित्रपटाच्या माध्यमातून जगभरात पोहोचणार आहे.
चित्रपट तयार असून, कोरोना प्रादुर्भावामुळे चित्रपट प्रकाशित करता आला नाही. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येत असल्याचा आनंद आहे. यानिमित्ताने झाडीपट्टी रंगभूमीला येणाऱ्या वर्षात चांगले दिवस येतील.
- अनिल उट्टलवार, कलावंत, सिंदेवाही.