मद्य विक्रीची अनुज्ञप्ती मंजूर करताना नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका, येथे संबंधित प्रतिकरणाच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता राहणार नाही, असे १८ फेब्रुवारी २००९ च्या उत्पादन शुल्क विभागाच्या परिपत्रकात स्पष्ट म्हटले आहे. असे असतानाही चंद्रपूर शहरातील दाताळा रोड येथे जगन्नाथ मंदिराजवळ नवीन दारू दुकानाला महानगरपालिकेकडून परवानगी दिली गेला असल्याचा अपप्रचार केला जात आहे. वास्तविकतः चंद्रपूर शहर महानगरपालिका (Chandrapur CMCC) हद्दीत कोणत्याही व्यक्तीला दारूचे दुकान सुरू करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागामार्फत परवाना दिला जातो. याबाबतीत महानगरपालिकेकडून परवानगीची आवश्यकता नसते, असे स्पष्टीकरण आज रविवारी २४ मार्च रोजी देण्यात आले आहे.
शहरातील दाताळा रोड येथे जगन्नाथ मंदिराजवळ असलेल्या दारू दुकानाच्या संदर्भात सध्या आंदोलन सुरु असून काही व्यक्तींकडुन या दुकानाला चंद्रपूर महानगरपालिकेकडून परवानगी दिली गेला असल्याचा अपप्रचार केला जात आहे. यामुळे संभ्रम निर्माण होऊन दुकानाला परवानगी देताना महानगरपालिकेवर आरोप केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये महानगरपालिकेविरुद्ध विशेष संभ्रम निर्माण होत आहे. अश्या स्वरूपाच्या परवानगीत मनपाला विचारणा केली जात नाही तसेच अश्या स्वरूपाची परवानगी दिल्याची कल्पनाही मनपाला दिली जात नाही. शासन परिपत्रकानुसार सुद्धा अश्या प्रकरणांत महानगरपालिकेची परवानगी आवश्यक नसल्याचे नमुद केलेले आहे.