जिवती/ प्रतिनिधी
लढेंगे- जितेंगे, वनहक्क धारकांना पट्टा मिळालाच पाहिजे, श्रमिक एल्गार जिंदाबाद अश्या घोषणा देत जिवती तालुक्यातील वनहक्क धारकांच्या प्रश्नावर श्रमिक एल्गार संघटनेच्या वतीने आज जिवती तहसिल कार्यालयावर मोर्चा करण्यात आला. या मोर्चातून प्रामुख्याने प्रलंबित असलेल्या वनहक्क दाव्यावर कार्यवाही करण्यात यावी, गहाळ झालेल्या वनहक्क दाव्याची चौकशी करून नव्याने दावे तहसिल कार्यालयाने तयार करावे, वनहक्क दावे गहाळ केलेले कर्मचारी यांची चौकशी करून फौजदारी कार्यवाही करावी, वनहक्क पट्टे धारकांना 7/12 देण्यात यावा, वनहक्क पट्टे धारकांना पट्याचे आधारावर पीककर्ज देण्यात यावा, नाईकपोड जमातीच्या आदिवासींना वनहक्क दावे दाखल करण्यास प्रशासनाने पुढाकार घ्यावा, तलाठी यांच्या निष्काळजी पणामुळे वडिलोपार्जित शेती करणाऱ्या आदिवासींची अतिक्रमण रजिस्टर ला नोंद नसून चौकशी करून अतिक्रमण रजिस्टरला नोंद घेण्यात यावी, यासह इत्यादी मागण्या मोर्चातून करण्यात आल्या, मोर्चा विर बाबुराव शेडमाके चौकातून तहसिल कार्यालयावर घोषणबाजी करीत धडकला यावेळी श्रमिक एल्गार (shramik elgar)चे अध्यक्ष प्रविण चिचघरे (pravin chichghare), उपाध्यक्ष घनशाम मेश्राम (Ghanshyam Meshram), महासचिव डॉ. कल्यान कुमार (Dr. kalyankumar) यांनी मार्गदर्शन करून विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी श्रमिक एल्गार चे कार्यकर्ते लक्ष्मण मडावी, विमल कोडापे, सुरेश कोडापे, आनंदराव कोडापे, इसतराव कोटणाके, भिमराव मडावी, जलिम कोडापे, पुजू कोडापे, यासह इत्यादींनी मोर्चा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.