राज्य सरकार युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी मदत करणार
- आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार
Ø मदतीसाठी राज्य नियंत्रण तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा
चंद्रपूर,दि.26 : सध्या रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून राज्यातील अंदाजे 1200 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यातील 300 विद्यार्थ्यांशी पालकांचा संपर्क झाला आहे. राज्य नियंत्रण कक्ष विद्यार्थ्यांच्या संपर्कात असून महाराष्ट्र शासनाकडून या विद्यार्थ्यांना तसेच अडकलेल्या नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
श्री. वडेट्टीवार म्हणाले, युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती जिल्हास्तरावर देखील संकलित करण्याचे काम सुरू आहे. सर्व जिल्हाधिका-यांनी देखील हेल्पलाईन नंबर जाहीर केलेले आहेत. राज्याचा नियंत्रण कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर, मोबाईल तसेच व्हॉटस क्रमांक ९३२१५८७१४३ आणि controlroom@maharashtra.gov.in या ईमेलवर संबंधितांनी संपर्क साधावा. महाराष्ट्रातील किती लोक युक्रेनमध्ये अडकले आहेत, याची माहिती विभाग घेत आहे. तात्काळ संपर्क केंद्रही सुरू केले आहे. आवश्यक सर्व मदतीसाठी राज्य सरकार देण्यास तयार आहे. केंद्र सरकारने उपाययोजना केल्या आहेत. कदाचित युक्रेनमधून विमान उडू शकणार नाही. बाजूच्या देशातून विमान घेण्याची तयारी सरकारने दर्शविली आहे. काही लोकांशी संपर्क होण्यात अडचणी येत आहेत. तसेच युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालयाने, नवी दिल्ली येथे हेल्पलाईन्स कार्यन्वित केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालय, नवी दिल्ली येथील क्रमांक खालीलप्रमाणे आहेत.
● टोल फ्री - 1800118797
● फोन 011-23012113 / 23014104 / 23017905
● फॅक्स 011-23088124
● ईमेल situationroom@mea.gov.in या हेल्पलाईनवर संपर्क
साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.