संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि. २० फेब्रुवारी:-
काल (दिनांक १९ ) ला रात्री अकरा बारा वाजे दरम्यान येथील विनोद शामराव डोंगरवार(कुंभार मोहल्ला) यांच्या घरा वजा गोठ्यात कवेलू काढून बिबट्याने प्रवेश केला. गोठ्यात झाकून ठेवलेल्या तीन कोंबडे व दोन कोंबड्या पैकी १ कोंबडा व २ कोंबड्या जागेवरच बिबट्याने फस्त केल्यात,तर दोन कोंबडे बिबट वाघ घेऊन गेला.शेजारीच बांधलेली म्हैस बिबट्याला घाबरल्यामुळे खुंटा वरून सुटली व बिथरली. त्यामुळे बिबट पळून गेला असावा.सकाळी उठून विनोद जेव्हा कोंबड्या सोडायला गेला तेव्हा तीन कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या तर दोन कोंबडे गायब असल्याचे त्याला दिसले. गोठ्याच्या आजूबाजूला बिबट्याचे पायाचे ठसे उमटलेले दिसले. विनोद यांनी येथील वन विभाग प्रादेशिक कार्यालयात सदर घटनेची माहिती दिली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.अंदाजे दीड ते दोन हजार रुपयाचे विनोद डोंगरवार यांचे नुकसान झाले आहे. गावात गाई,म्हशीं,शेळया, बकरे पाळत आहेत.त्यामुळे गो पालकांचे देखील धाबे दणाणले आहेत. त्यांच्या आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.गेल्या पंधरा दिवसापासून गावात बिबट वाघ फिरत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. पर्यंत बिबट्याने दहा-बारा कोंबड्या फस्त केल्याची माहिती आहे.चीरघराच्या मागील रेल्वे लाईन च्या बाजूने गावात हा बिबट प्रवेश करीत असतो. बहुतेक तो भिवखिडकी च्या जंगलातून येत असावा. असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे गावात दहशतीचे वातावरण पसरलेले आहे. वन्यजीव मानव संघर्ष होऊ नये. म्हणून वन विभागाने वेळीच या बिबट्याचा बंदोबस्त करावा. अशी मागणी नवेगावबांध ग्राम वासियांनी केली आहे.