Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जानेवारी ०९, २०२२

प्रतिभासंपन्न आमदार




प्रतिभासंपन्न आमदार


*- गोविल मेहरकुरे 9689988282*


महिलांना आत्मबळ मिळावे, त्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी शक्ती कायद्याची सर्वप्रथम मागणी करणाऱ्या तसेच तृतीयपंथी समाज बांधवासाठी पोलीस विभागात आरक्षण मिळण्याकरिता सतत पाठपुरावा करणाऱ्या महिला आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी ध्यास घेत स्वप्न बघून ते सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न केलेत. पुष्पमाला घालण्याऐवजी ज्ञानाची शिदोरी जोपासणाऱ्या प्रतिभाताईंचा आज (९ जानेवारी) वाढदिवस.

अल्पावधित लाेकप्रिय ठरलेल्या वराेरा-भद्रावती क्षेत्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव महिला आमदार, सर्वांच्या ताईसाहेब प्रतिभाताई धानाेरकर ह्यांचा जन्म दिनांक ९ जानेवारी १९८६ राेजी यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालूक्यातील परमडाेह या गावी झाला. त्यांच्या माहेरच्या कुटुंबास कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. वडील सुरेशजी काकडे व आई गिताताई ह्यांच्या त्या लाडक्या कन्या. लहानपणापासून त्यांना समाजसेवेची आवड होती. कर्तुत्वाने जनसेवेचा वसा घेण्याची त्यांची इच्छा होती. लग्नानंतर योगायोगाने जोडीदार देखील त्यांना तसाच मिळाला.

राजकीय पार्श्वभूमी असलेले खासदार सुरेश धानोरकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लहानपणापासून समाजात राहून काम करण्याची आवड व समाजातील शेवटच्या वर्गाकरिता काहीतरी करण्याची तळमळ त्यांच्यात नेहमी होती. पती सोबत नेहमी त्या सक्रिय राजकारणात सुरुवातीच्या काळात नसल्या तरी सामाजिक कार्यात त्या नेहमी पुढे असत. बाळूभाऊ खासदार झाल्यानंतर वरोरा विधानसभा निवडणूकीत योग्य उमेदवार नसल्यामुळे वरोरा-भद्रावती विधानसभेतील जनतेला न्याय देण्याकरिता प्रतिभाताईला उमेदवारी दिली. जनतेने त्यांना मताधिक्य देवून विधानसभेत संधी दिली.

वराेरा-भद्रावती क्षेत्र हे महिलांकरिता राखीव क्षेत्र नसले तरी लहानपणापासूनच महत्वाकांशी असलेल्या प्रतिभाताई धानाेरकर ह्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली. त्यांना पक्षाने उमेदवारी दिल्यामुळे अनेकांच्या भुवया ऊंचावल्या. त्यांची उमेदवारी ही काेणत्याही प्रकारच्या घराणेशाहीचा प्रकार नसला तरी घराणेशाहीचा त्यांच्यावर आराेप करण्यात आला. सुरुवातीस त्यांना विराेध झाला. त्या एक महिला म्हणून सक्षम उमेदवार ठरणार नाही, असा अनेकांचा समज हाेता. परंतू उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी कटारिया भवन येथे सभेत त्यांनी जे भाषण दिले, त्यातून त्यांच्या वक्तृत्व शैलीचा परिचय अनेकांना झाला. नियाेजनबद्ध प्रचारांनी त्यांनी मने जिंकली. त्या एक सक्षम उमेदवार ठरतील ही खात्री झाली. बाळूभाऊंची समर्थ साथ, त्यांचा मित्रपरिवार व क्षेत्रातील जनतेचा त्यांना मोठा पाठिंबा मिळाला. त्यामुळेच त्यांच्यासमाेर सर्व बलाढ्य उमेदवार असतांना देखील त्या प्रचंड बहूमताने विजयी हाेवून चंद्रपूर जिल्ह्यातून एकमेव महिला आमदार ठरल्या.

त्यांचे माहेर किंवा सासर घराण्यात राजकिय वारसा नसला तरी आपल्या कर्तृत्वाने जिल्हा शिवसेना प्रमुख ते आमदार तथा विद्यमान खासदार झालेले कार्यकुशल पती बाळूभाऊ धानोरकर ह्यांचे साेबत केलेल्या कार्यामुळे त्यांना राजकिय व सामाजिक कार्याच्या अनुभवा मिळाला. आमदार म्हणून निवडून येताच त्यांनी क्षेत्रातील जनतेशी सतत संपर्क ठेवत लाेकांच्या प्रश्नांची साेडवणूक करण्यास आरंभ केला. अल्पकाळातच काेराेनाचे देशात संक्रमण सुरू झाले, तेव्हा त्याकाळात त्यांनी काेराेनाचा आपल्या क्षेत्रात शिरकाव हाेणार नाही याची दक्षता घेतली. कोरोना प्रतिबंधासाठी प्रयत्नशील व कार्यरत असल्यामुळेच काेराेनाचा शिरकाव ब-याच उशिरा या क्षेत्रात झाला. काेराेना संशयीतांचा शाेध घेत रुग्नांवर उपचार व्हावा, यासाठी जातीने लक्ष दिले. लाॅकडाऊनमुळे अनेकांना राेजगार नसल्यामुळे गावांत ५ रुपयांत जेवन देणारी २ शिवभाेजन केंद्रे त्वरीत सुरू केली. अनेक कुंटुबांना तयार अन्नाची पाकिटे व धान्य पुरविले. आपल्या क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर, महिला व सर्वसाधारण जनता ह्यांच्या समस्या निवारणासाठी विधानसभेत प्रश्र्न मांडले. संबधीत खात्यांचे मंत्री ह्यांच्याकडे प्रभावीपणे प्रश्न व निवेदने देवून अनेक समस्या सोडविण्याकरिता त्यांची भुमीका नेहमी आग्रही असते.

तृतीयपंथीयांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी त्यांना पोलीस विभागात व इतर विभागात दोन टक्के आरक्षण देऊन नोकरीत स्थान द्यावे, अशी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. त्या केवळ एवढ्यावरच थांबल्या नाहीत, तृतीयपंथीयाकडे सरकारचे लक्ष वेधले जावे म्हणून आ.प्रतिभा धानोरकर यांनी यंदाची दिवाळी पती खासदार बाळू धानोरकर यांच्यासोबत त्यांच्या घरी तृतीयपंथीयांसोबत साजरी केली. तृतीयपंथीयांसाठी निवास, नोकरी यांसदर्भात काम करणार असे कृतियुक्त आश्‍वासन त्यांनी दिले. दिवाळी संपताच लगेच त्या कामाला लागल्या आणि आज त्यांनी एक टप्पा पूर्ण केला. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्यांनी या मागणीचे निवेदन दिले. याचा पाठपुरावा करून त्या आरक्षण मिळवतीलच, असा विश्‍वास तृतीयपंथीयांना आहे. आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात दिशा कायदा अमलात आणावा, यासाठी त्या आग्रही होत्या. सर्वप्रथम नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात त्यांनीच ही मागणी केली होती. त्याचा सातत्याने पाठपुरावा केला होता. आज ‘दिशा’ च्या धर्तीवर महिलांसाठी 'शक्ती' हा कायदा आकार घेतो आहे. मतदार संघातील महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरिता त्या नेहमी आग्रही असतात. बचत गटातील महिलांना त्यांचा माल विकणासाठी स्वतंत्र हक्काची बाजारपेठ उभी राहण्याकरिता बचत गटाचे मार्केट उभे करण्याची संकल्पा त्यांची आहे. त्यादृष्टीने त्या पाठपुरावा करीत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची, कामाची दखल घेत महाराष्ट्र काँग्रेस कमिटीने महिला प्रदेश उपाध्यक्ष पदावर त्यांची नियुक्ती केली आहे.

महिलांच्या प्रश्र्नांची जाण व काम करण्याची तळमळ बघून त्यांची मा.सभापती तथा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांची निवड महिला बाल अधिकार समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती केली. त्यासोबतच त्यांना ग्रामीण भागातील समस्यांची जाणीव असल्यामुळे त्यांची पंचायत राज समितीवर देखील नियुक्ती करण्यात आली आहे. आज वाढदिवशी देखील त्यांनी पुष्पगुच्छांऐवजी विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत उपयुक्त असणारी पुस्तके भेट द्यावी, असे मार्मिक आवाहन केले आहे. भविष्यात अधिकारी होणाऱ्या विद्यार्थ्यांना ही पुस्तके नवसंजीवनी ठरतील, यात शंका नाही.

•••

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.