Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, डिसेंबर ०५, २०२१

निर्भिड पत्रकार विनोद दुआ | #VinodDua



तो दूरदर्शनचा काळ होता. विनोद दुआ टीव्हीत होते. त्यांचा परख हा कार्यक्रम देशभर गाजत होता. या 'परख'वर आपण कधी तरी झळकू हे स्वप्नात देखील वाटले नव्हते. तेव्हा माझी पत्रकारितेची सुरवात होती. लोकमतमध्ये माझ्याकडे क्राईम व आरोग्य बीट होते. बहुधा 1986 ची घटना असेल. 

 शासकीय वैद्यकीय रुग्णालयात एका महिलेसह सहा जणांना एचआयव्ही पॉजिटिव्ह रक्त देण्यात आले. या घटनेची कुजबूज होती. या कारणाने एका महिलेचा छळ सुरू झाला. त्या महिलेला वेगळे करण्यात आले. तिला माहेरी जा असा सासरच्यांनी तगादा लावला होता. या बातमीची शहनिशा करण्यास महिलेचे घर गाठले. घरवाल्यांसोबत चर्चा केली. तेव्हा ही एक नाही.सहा रुग्णांना रक्त देण्यात आल्याचं सांगण्यात आलं. महिला रडून छळाची माहिती देत होती. वेगळी ठेवतात. एकटी राहते. जीव नकोसा झाला. असं म्हणत मेडिकलवाल्यांचा उध्दार करीत रडू लागली. घरवाले बातमी छापून आमची बदनामी करू नका.असं बजावत होते. ते कुटुंब दहशतीत होते. प्रकरण लपविण्याचा आटापिटा होता. कुटुंब मध्यमवर्गीय होतं. एडस विषाणूयुक्त रक्त दिल्याने आता एडस होणार. संपर्कानेही एडसची लागण होते. हा 1980 च्या दशकात समज होता. या कारणाने ते सहा जण आणि त्यांचे कुटुंबीय दहशतीत होते. नाव येणार नाही. कुटुंबाची ओळख पटणार नाही. ही हमी देत बाहेर पडलो.




नागपुरातून परखवर लाईव्ह
लगेच मेडिकल गाठले. काहींना भेटलो. वृत्त संकलन केले. दुसऱ्या दिवशी लोकमतमध्ये पान एकवर विशेष बातमी छापून आली.एकच खळबळ माजली. आठवडाभर बातमीचा फॉलोअप चालू होता. अन् एक दिवस दिल्लीवरून फोन आला. कॅमेरामॅन आणि रिपोर्टर नागपूरला येत आहे. सहकार्य करा. त्यानुसार भोपालवरून दूरदर्शनचा रिपोर्टर राकेश बादल व कॅमेरामॅन नागपुरात आले. हॉटेल सेंटर पॉईंटला थांबले.त्यांनी विनोद दुआ यांनी पाठविल्याचे सांगितले. तेव्हा पहिल्यांदा विनोद दुआा यांचं नाव माहित झालं. तेव्हापासून त्यांचे कार्यक्रम व बातम्या आवर्जून बघत होतो. दूरदर्शन सरकारी. मेडीकल रुग्णालयही सरकारी होतं. तरी त्या विरोधातील बातमीसाठी विशेष पत्रकार व फोटोग्राफर पाठविणारे विनोद दुआ यांची पत्रकारिता किती अव्वल, नि:पक्ष होती.याची प्रचिती त्या एका घटनेवरून येते. अशी अनेक घटना आहेत.अलिकडे ते स्वतंत्र वेबसाईट चालवित. त्यांच्या एका बातमी प्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हा सरकारची व तक्रारवाल्या व्यक्तींची कीव वाटली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने तो खटला रद्द केला. हा भाग वेगळा.यावरून त्यांचे मोठेपण लक्षात येते. परखच्या पथकाने एडस् विषाणू युक्त रक्त प्रकरणाची दखल घेतली. वृत्त संकलन केले.अन् मेडिकलच्या आवारातून लाईव्ह प्रसारण केलं. त्या जागेवर आता मेडिकल शॉप आहे. त्याची अँकरिंग विनोद दुआ यांनी केली. पहिल्यादा बातमीच्या संदर्भात मी टीव्हीवर झळकलो. त्याचे श्रेय विनोद दुआ यांना आहे. या प्रकरणी दोन डॉक्टरसह पाच जणांवर कारवाई करण्यात आली होती. रक्तपेढीवर सुध्दा कारवाई झाली. परवानाही रद्द करण्यात आला. त्या सहा रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. त्यानंतर रक्तपेढीचे नियम कडक करण्यात आले. दिल्लीत बसून देशातील घटनांची दखल घेणारे विनोद दुआ सच्चे पत्रकार होते. रवीशकुमार , एनडीटीव्ही व अन्य वाहिन्यांनी त्यांची दखल घेतली. यावरून त्यांचे मोठेपण सिध्द होते. त्यांच्या पत्रकारितेची लोकांसोबत बांधिलकी होती. त्यांच्या अकाली निधनाने देशाने राष्ट्रवादी व सच्चा पत्रकार गमावला. त्यांना विनम्र अभिवादन!!!

-भूपेंद्र गणवीर

.................BG.....................

Vinod Dua

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.