Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, डिसेंबर २३, २०२१

माणिकगडचे वायू प्रदूषण त्वरित थांबवा, अन्यथा जनआंदोलन उभारणार # korpna



माणिकगडचे वायू प्रदूषण त्वरित थांबवा, अन्यथा जनआंदोलन उभारणार

आशिष देरकर यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

कोरपना :- कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील जुनी माणिकगड सिमेंट कंपनी व नवीन अल्ट्राटेक सिमेंट कंपनी प्रचंड प्रमाणात वायू प्रदूषण करीत असून गडचांदूर येथील नागरिकांचे यामुळे सरासरी आयुर्मान घटत आहे. तात्काळ माणिकगड सिमेंट कंपनीचे वायुप्रदूषण न थांबविल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा आशिष देरकर यांनी जिल्हाधिकारी व प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांना निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.
मोठ्या प्रमाणात सिमेंटच्या धुळीचे कण लोकांच्या घराच्या छतावर, अंगणात, झाडांवर, वाहनांवर रोज साचत असून त्याबाबत फोटो व व्हिडिओ उपलब्ध आहे. प्रचंड प्रमाणात हे धुळीचे कण वातावरणात पसरत असल्यामुळे शरीरात सुद्धा धुळीचे कण जाऊन अनेक नागरिक विविध रोगांनी ग्रासले आहे. परिसरातील इतर कंपन्यांमध्ये वायू प्रदूषणाचा इतका त्रास नसून गडचांदूरसारख्या ५० हजार लोकवस्तीच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण ही सिमेंट कंपनी करीत आहे.
     अनेक आंदोलने, मोर्चे व निवेदने देऊन सुद्धा प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप देरकर यांनी निवेदनात केलेला आहे. वायू प्रदूषणाबाबत खोटा अहवाल तयार करुन शासनास पाठविण्याचे काम प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे आम्ही कोणाला न्याय मागायचा हा प्रश्न आहे. या आधी सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना मेलद्वारे सिमेंट कंपनीच्या चिमणीतून सुटणारा धूर व त्यामुळे होणारे प्रदूषण याबाबत फोटो निवेदनासह पाठविले आहे. मात्र त्यावर अजूनपर्यंत काहीही कारवाई झालेली नाही.
       


 वायू प्रदूषण इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की, घरातून बाहेर निघण्याची सुद्धा नागरिकांची हिंमत होत नाही. जुनी माणिकगड सिमेंट कंपनी व सध्याच्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनी गडचांदूरकडून वृद्ध, प्रौढ, युवा व बालकांच्या आरोग्यास फार मोठ्या प्रमाणात धोका असून ही हानी कधीही न भरणारी आहे. त्यामुळे त्वरित माणिकगड सिमेंट कंपनीवर कारवाई करून गडचांदूर येथील नागरिकांचे आरोग्य वाचवावे. अन्यथा शासनाच्या विरुद्ध प्रदूषणाविरोधात मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा आशिष देरकर यांनी दिला आहे

-आशिष देरकर सदस्य, प्रदूषण नियंत्रण कृती समिती, गडचांदूर

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.