प्रभावी जनसंपर्कासाठी नवमाध्यमांची ओळख गरजेची : माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर
पुणे : जनसंपर्कातील नव्या प्रवाहांचे ज्ञान सातत्याने अद्ययावत करणे आवश्यक असून शासकीय योजना, धोरण आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करावा असे आवाहन पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर यांनी केले.
‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ अंतर्गत विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय पुणेच्या संयुक्त विद्यमाने विभागीय माहिती कार्यालय पुणे तसेच पुणे व सातारा जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी आयोजित ‘समाज माध्यम कार्यशाळे’च्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते.
डॉ. पाटोदकर पुढे म्हणाले, शासनाचे प्रसिद्धी आणि जनसंपर्काचे माध्यम म्हणून काम करताना माहिती व जनसंपर्क विभागाला बातमीची विश्वासार्हता, अचूकता जपत ती वेगानेही माध्यमांकडे पाठवण्याचे भान राखावे लागते. वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि आता समाजमाध्यमाद्वारे संदेशवहन वेगाने होते. एखादी बातमी, संदेश लक्ष्याधारित (फोकस्ड) पद्धतीने पोहोचवायचा असेल तर त्यासाठी समाजमाध्यमांमधील बारकावे शिकून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरेल असे डॉ. पाटोदकर म्हणाले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांनी उपस्थितांना ट्वीटर, फेसबुक, कू या समाजमाध्यमांबाबत तपशीलवार माहिती दिली. प्रास्ताविक माहिती अधिकारी सचिन गाढवे यांनी तर आभारप्रदर्शन माहिती सहायक गीतांजली अवचट यांनी केले. या कार्यशाळेस माहिती सहायक रोहिदास गावडे यांच्यासह सुहास सत्वधर, मिलिंद भिंगारे, सचिन बहुलेकर, जयश्री रांगणेकर, वैभव जाधव, राहूल पवार, विशाल कार्लेकर, सुजीत भिसे, वर्षा कोडलिंगे, सुमेध मनोर आदी उपस्थित होते.
Deputy Director of Information, Pune Division