नवेगावबांध दि.२ डिसेंबर:-
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर रायपूर कडून औरंगाबाद कडे जाणारा कच्चा तेल वाहून नेणाऱ्या टँकरला सौंदड पासून दोन किलोमीटर अंतरावरील चुलबंद नदी लगत पूला जवळ अपघात होऊन, स्त्याच्या कडेला उलटला. टँकरमधून रस्त्याच्या कडेला व नदीत वाहणारा तेल नेण्यासाठी परिसरातील गावातील स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. घटनास्थळावर डुग्गीपार पोलीस दाखल झाली आहे. सदर अपघात आज दिनांक २ डिसेंबर रोज गुरुवारला संध्याकाळी ५.०० ते ५.१५ वाजेच्या दरम्यान झाला.
सदर टँकर क्रमांक सीजी०८ए,एम २३४७ छत्तीसगड राज्यातील रायपूर वरून कच्चा तेल घेऊन रिफाइंड करण्यासाठी औरंगाबादला जात असल्याचे समजते. सौंदड पासून दोन किलोमीटर अंतरावरील चुलबंद नदीच्या पुलाजवळ टँकरला अपघात झाला. ही माहिती वाऱ्यासारखी सौंदड, फुटाळा व परिसरात पसरली. रस्त्याच्या कडेवरुन नदीत सदर तेल वाहत असल्याने, लोकांनी ते घेण्यासाठी महिला पुरुषांसह घटनास्थळी बहुसंख्येने गर्दी केली. ज्याला जेवढे मिळेल तेवढे तेल घेण्यासाठी जणू लोकांची स्पर्धाच लागली होती. घटनास्थळावर वाहतूक पोलीस व डुग्गीपार पोलीस वाहतूक नियंत्रण करण्यासाठी उपस्थित आहेत. या अपघातात कुठलीही जीवितहानी मात्र झाली नाही. वृत्त लिहीपर्यंत परिसरातील शेकडो लोक घटनास्थळावरून तेल नेत असल्याचे दिसून आले.