इकार्नियापासून हस्तशिल्प निर्मिती
राज्यात पहिलाच प्रयोग
महिला बचत गटांना नगरपरिषद तर्फे प्रशिक्षण
चंद्रपूर /पर्यावरणाच्या दृष्टीने इकॉर्निया वनस्पती घातक आहे. राजुरा नगर परिषद समोरील जुने मामातलाव संपूर्ण इकॉर्निया वनस्पतीने झाकलेले आहे. यामुळे मासेमारी व्यवसायावर अवकळा आलेली आहे. मात्र याच उपद्रवी वनस्पतीपासून सुंदर हस्तशिल्प बनविण्याचे प्रशिक्षण राजुरा नगरपरिषद महिला बचत गटांना देत आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग राजुरा नगर परिषदेने हाती घेतलेला आहे. नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या दूरदृष्टीतून टाकाऊपासून पर्यावरण पूरक वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण केंद्र सर्वांचे आकर्षण ठरलेले आहे.
नगरपरिषद राजुरा व अजय बहुदेशिय संस्था भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमानाने बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. नगर परिषद राजुरा समोरील ऐतिहासिक मालगुजारी तलावातील उपद्रवी वनस्पती जलकुंभी इकॉर्निया पासून हस्तशिल्प तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मागील दोन आठवड्यापासून क्रीडा संकुल येथे महिला बचत गटातील सदस्य मुख्य प्रशिक्षक स्वाती धोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे धडे गिरवीत आहेत व महिला अतिशय सुंदर वस्तू तयार करीत आहेत.
मागील बऱ्याच महिन्यापासून या तलावात जलकुंभी इकार्निया वनस्पतीची वाढ मोठ्या प्रमाणत झाले आहे. यामुळें पाण्याच्या प्रदूषणात वाढ होऊन तलावाचे नैसर्गिक सोंदर्य नष्ट होते आहे. मात्र नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी पुढाकार घेऊन अजय बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून येथील इकार्निया वनस्पती पासून हस्तशिल्प निर्मिती प्रशिक्षण सुरू केले आहे.
हस्त शिल्प तयार करण्यासाठी इकॉर्निया वनस्पतीला दोन ते तीन दिवस उन्हात वाळविले जाते. त्यापासून नंतर त्यांचे धागे काढण्यात येतात .त्याच मजबूत धाग्यापासून विविध आकर्षक वस्तू तयार करण्यात येतात. संस्थेअंतर्गत प्रशिक्षण देणाऱ्या महिला आसाम येथील विशेष प्रशिक्षण घेतलेले आहेत. राजुरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी या स्वयंसेवी संस्थेला प्रशिक्षण देण्यासाठी क्रीडासंकुल येथील सभागृह उपलब्ध करून दिलेले आहे. यासाठी महिला बचत गटातील निवडक सदस्यांची निवड करण्यात आलेली आहे व त्यांना दररोज दहा ते पाच वाजेपर्यंत प्रशिक्षण देण्यात येत आहे. कौशल्याधिष्ठित प्रशिक्षणातून अनेक महिलांनी अतिशय सुंदर उपयोगी दैनंदिन जीवनातील वस्तू तयार केलेल्या आहेत. या वस्तू अत्यंत टिकाऊ स्वरूपाचे असल्याची माहिती प्रशिक्षकांनी दिली.
कुठलीही रासायनिक प्रक्रिया न करता या वनस्पतीपासून वेगवेगळे उपयोगी वस्तू बनविता येतात. महिलांसाठी निश्चितच आर्थिक पाठबळ देणारे आहे हा उपक्रम आहे. कारण या वनस्पतीपासून तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मोठी मागणी आहे .यासाठी संस्थेने मोठे जाळे निर्माण केले आहे. त्यामुळे महिलांना आर्थिक आधार मिळेल व महिला स्वावलंबी होतील.
महिला बचत गटांना प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मित करणे आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या सबळ बनविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. शहरातील अधिकाधिक महिला बचत गटांनी उपक्रमात सहभागी व्हावे आणि आपले राजुरा शहर स्वच्छ, सुंदर, सदाहरित बनविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले आहे.
Beautiful things made from deadly icornia
बचत गटातील महिला स्वावलंबी व्हाव्यात आर्थिक दृष्ट्या परिपूर्ण व्हाव्यात यासाठी हे प्रशिक्षण अतिशय उपयुक्त आहे. राज्यात पहिल्यांदाच हा प्रयोग राजुरा नगरपालिका राबवित आहे.निरोपयोगी एकोर्निया वनस्पतीचे वापर करून जे निरनिराळे हस्तशिल्प तयार करण्यात आले त्याची प्रदर्शनी लवकरच नगर परिषद राजुरा कार्यालय परिसरात लावण्यात येईल आणि विक्री करिता ते खुले करण्यात येईल. यामुळे महिला बचत गट आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण होतील. - नगराध्यक्ष अरुण धोटे ,राजुरा