तीन वर्षांत डिजिटल व्यवहारांच्या प्रमाणात 88% वाढ
नवी दिल्ली, 21 डिसेंबर 2021
सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे भारतातील डिजिटल व्यवहारांमध्ये आमूलाग्र बदल घडून आला आहे. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरादरम्यान ही माहिती दिली.
'गेल्या तीन वित्तीय वर्षांतील डिजिटल व्यवहारांच्या प्रमाणातली वाढ बघता हा बदल त्यात प्रतिबिंबित झाल्याचे दिसून येते', असे सांगून डॉ.कराड यांनी त्याविषयी पुढीलप्रमाणे माहिती दिली-
Financial Year | Volume (in lakhs) |
2018-19 | 2,32,602 |
2019-20 | 3,40,025 |
2020-21 | 4,37,445 |
Source: RBI
वरील सारणीनुसार, गेल्या तीन वर्षांत 2018-19 पासून डिजिटल व्यवहारांच्या प्रमाणात 88% वाढ झाली असल्याचे मंत्रिमहोदयांनी सांगितले.
डिजिटल व्यवहार मंच हा एक अखिल भारतीय मंच असून, 'कधीही, कोठेही' बँक सुविधा वापरण्याची सोय त्यामध्ये दिलेली असते. त्याप्रमाणे, केवळ राष्ट्रीय पातळीवरच माहिती गोळा केली जाते, असेही त्यांनी सांगितले.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने, प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, पैसे देण्यासाठीचा भारताचा स्वतःचा मंच- यूपीआय - याला डिजिटल पेमेंटसाठी आवडता मंच म्हणून देशाने पसंती दिली आहे. वित्तीय वर्ष 2020-21 मध्ये 22 अब्जापेक्षा अधिक व्यवहार या मंचावर नोंदले गेले. गेल्या तीन वर्षांमध्ये यूपीआयने चौपट वाढ दर्शवली आहे. शिवाय, वित्तीय वर्ष 2020-21 मध्ये AePS (म्हणजे 'आधार'वर अवलंबित पेमेंट प्रणाली) आंतर-बँक व्यवहारांमध्ये गेल्या चार वर्षांच्या तुलनेत नऊ पटींनी वाढ झाली आहे, अशी माहिती डॉ.कराड यांनी दिली.