जुन्नर /वार्ताहर - -देशातील परीस्थिती कधी नव्हे ईतकी सामाजिक दृष्ट्या दोलायमान झाली असुन सामाजिक सख्यं टिकऊन ठेवणे आवश्यक असल्याचे मत राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते विलास किरोते यांनी व्यक्त केले. ते वै. दिनकरराव कोठारे स्मृती प्रतिष्ठान या संस्थेने आयोजीत केलेल्या "श्री अभंग दिनदर्शिका- २०२२ च्या प्रकाशन सोहळा प्रसंगी प्रमूख पाहूणे म्हणून बोलत होते.
या देहू येथील प्रकाशन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिव व्याख्याते ह.भ.प. गणेश महाराज फरताळे, ह. भ.प. प्रबोधनकार डाॅ कैलास पाटोळे हे होते, तर अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. देवराम (आण्णा) कोठारे उपस्थित होते.
आपल्या मनोगतात किरोते यांनी भारतातील विकास आणि वास्तव याची अनेक उदाहरणे देत सामाजिक समतोल, सर्वव्यापी विकास, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, शेतक-यांना न्याय मिळाला पाहिजे असे सांगितले. महिलांना महाराष्ट्रात संरक्षण आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळाली पाहिजे व गैरसमज पसरवणा-यापासून सावध राहीले पाहीजे असे सांगितले.
प्रमुख पाहुणे ह.भ. प. शिवव्याख्याते श्री. गणेश महाराज फरताळे आणि ह.भ.प. प्रबोधनकार डाॅ. केलाश पाटोळे यांनी बहुजन समाजातील कालबाह्य रूढी, परंपरा, चालीरिती विरूद्ध संतांनी केलेल्या बहुमोल कार्याचा उहापोह केला. तर हभप श्री देवराम (आण्णा) कोठारे यांनी साम्यवादाचे /समाजवादाचे खरे जनक जगद्गुरू तुकाराम महाराज असल्याचे प्रतिपादन केले. सदर प्रसंगी प्रा. डाॅ. विजय बालघरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास क्षीरसागर महाराज व मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक आणि श्रोते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. नरेंद्र पवार यांनी केले.