पाथरी पोलीस ठाण्यात तक्रार; ग्रामपंचायतीला निवेदन
पाथरी / प्रतिनिधी
तालुक्यातील मेहा बुजरूक येथे गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी शुद्ध मिळावे, याकरिता ग्रामपंचायतीच्या मार्फतीने आरो प्लांट लावण्यात येत आहे. मात्र या प्लांटची निर्मिती आणि उभारणी मध्यवर्ती भागातील हनुमान मंदिराच्या पटांगणावर करण्यात येत आहे. सार्वजनिक उत्सवाच्या ठिकाणी खोदकाम करण्यात आल्याने मंदिराचा दर्शनी भाग दबला जातो. त्यामुळे गावकऱ्यांनी विरोध केला आहे. दरम्यान पाथरी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मेहा बुजरुक येथे कोणतीही पाणीपुरवठा योजना नाही. त्यामुळे गावकऱ्यांची तहान विहिरी आणि हातपंपाच्या पाण्यावर भागते. अशुद्ध पाण्यामुळे विविध प्रकारचे आजार होतात, याची दखल घेऊन ग्रामपंचायतीने नागरिकांच्या सुविधाकरिता आरो प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला. गावातील प्रत्येक नागरिकाला शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उदात्त हेतूने ग्रामपंचायतीच्या वतीने हनुमान मंदिर पटांगणात शुध्द पाण्याचा आरो प्लांट उभारण्यात येत आहे. त्यासाठी कंत्राटदाराने मनुष्यबळ लावून पायव्याचे खोदकाम केले. तत्पूर्वी जागेसंदर्भात कोणतीही पूर्वसूचना गावकऱ्यांना देण्यात आली नाही.
गावातील हनुमान मंदिर हे पारंपारिक उत्सवाचे ठिकाण असून, येथे पोळा, तान्हा पोळा आणि अनेक धार्मिक कार्यक्रम होत असतात. कार्यक्रमासाठी हे ठिकाण महत्त्वाचे असतानाही ग्रामपंचायतीने कोणताही विचार न करता या ठिकाणी आरो प्लांट उभारण्यासाठी कंत्राटदारास परवानगी दिली. या प्रकारास गावकऱ्यांनी विरोध दर्शविला असून, खोदकाम आणि बांधकाम तातडीने थांबवण्याची मागणी ग्रामपंचायतीचे सरपंच रुपेश रामटेके यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे. सदर बांधकाम दुसऱ्या ठिकाणी करण्याची मागणीदेखील करण्यात येत आहे.