मर्दनटोला जंगल परिसरात झालेल्या पोलिस-नक्षल चकमकीत 27 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात जिल्हा पोलिस दलाला यश आले होते. या नक्षल्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नक्षल्यांनी आज, 27 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रासह 6 राज्यात बंदचे आवाहन केले. या बंदच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारच्या सुमारास भामरागड उपविभागातील कोठी पोलिस मदत केंद्राअंतर्गत येत असलेल्या रस्ता बांधकामावरील दोन ट्रक्टरची नक्षल्यांनी जाळपोळ केली आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांच्या या हिंसक कारवाईमुळे सदर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नक्षलांकडुन आज महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओडिसा, मध्यप्रदेश, छत्तीसगड या 6 राज्यात बंद पुकारण्यात आला होता. बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात बंदला कोणताच प्रतिसाद मिळाला नसतांना तालुक्यातील अतिसंवेदनशील भाग असलेल्या कोठी पोलिस मदत केंद्र हद्दीपासून अवघ्या 6 किमी अंतरावर असलेल्या मरकनार-मुरुमबुशी या रस्ता बांधकामावरील दोन ट्रॅक्टर सशस्त्र नक्षल्यांनी जाळले.
मागील काही दिवसांपासून छत्तीसगड राज्यातील एका कंत्राटदारामार्फत मरकनार-मुरुमबुशी रस्त्याचे बांधकाम सुरु आहे. दरम्यान शुक्रवारी दुपारच्या सुमारास मजूर काम करीत असतांना प्राथमिक अंदाजानुसार 15 ते 20 च्या संख्येत असलेल्या सशस्त्र नक्षल्यांनी बांधकाम स्थळ गाठित मजूरांना पिटाळून लावले. त्यानंतर बांधकामावरील दोन ट्रॅक्टरना त्यांनी आगीच्या हवाली केले. यात दोन्ही ट्रक्टर जळून खाक झाले. यात कंत्राटदाराचे लाखोचे नुकसान झाले आहे. कोटी पोलिसांना घटनेची माहिती प्राप्त होताच आज, सकाळच्या सुमारास पोलिस जवानांनी घटनास्थळ गाठले असून अधिक तपास सुरु आहे. अज्ञात व्यक्तीविरोंधात कोटी पोलिस मदत केंद्रात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.