सुरजागड खदानीविरोधात बेमुदत ठिय्या आंदोलन
• २५ ऑक्टोबर रोजी सुरजागड लोह खदानीच्या ठिकाणी होणार आंदोलन
गडचिरोली : जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात आदिम आदिवासींचे वास्तव्य असलेल्या पारंपरिक वन क्षेत्रातील सुरजागड भागात शासनाकडून लोह खनिज उत्खनन प्रस्तावित करण्यात आले आहे. सुरवातीपासूनच आदिवासींचा व स्थानिकांचा या खदानीला विरोध होता आणि वेळोवेळी जिल्ह्याभरातील सगळ्या ग्रामसभा या खदानीविरोधात आक्षेप सुद्धा नोंदवत आले आहेत. लोकांचा तीव्र विरोध असतांना सुद्धा होत असलेल्या खदानी विरोधात सुरजागड पारंपरिक ईलाका गोटूल समितीतर्फे २५ ऑक्टोबर रोजी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
सुरजागड लोह अयस्क खदान प्रस्तावित करतांना स्थानिक आदिवासींना, ग्रामसभांना विश्वासात घेण्यात आले नाही. जेव्हा की वनहक्क कायदा, पेसा, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात यासंदर्भात स्पष्ट अशी तरतूद आहे. या कायद्यांचे उल्लंघन करून सदर खदान सुरू करण्यासाठी शासन, प्रशासन सतत प्रयत्नशील राहिलेले आहेत असा वारंवार आरोप स्थानिक ग्रामसभा व आदिवासींकडून केला जात आहे.
सुरजागड हे ठिकाण आदिवासींसाठी सांस्कृतिक दृष्ट्या फार महत्त्वाचे आहे. आदिवासींच्या परंपरांचे, संस्कृतीचे, सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचे असलेल्या ठिकाणांचे संवर्धन झाले पाहिजे यासंदर्भातील स्पष्ट तरतूद कायद्यात आहे परंतु या सगळ्या तरतुदींचा कुठेही विचार केला गेला.
यासोबतच सदर खदानीमुळे पर्यावरणाचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात संतुलन बिघडणार आहे. कारण हजारो एकर वरील घनदाट जंगल या प्रकल्पामुळे मुळे तोडण्यात येणार आहे. यामुळे पर्यावरणासोबतच जंगलावर निर्भर असलेल्या आदिवासींच्या उपजीविका आणि संसाधनांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम पडणार असल्याचे स्थानिक सांगतात.
उत्खननाचा परवाना मिळालेल्या लाॅयड्स ची पेटी काॅन्ट्रक्टर असलेल्या त्रिवेणी कंपनीकडून मायनिंग होणार असल्याने या खाणीत स्फोट करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी मागण्यात आली होती, त्यावर सुद्धा स्थानिक आदिवासींनी आक्षेप नोंदवला. या स्फोटाला कायदेशीर परवानगी मिळालेली नसताना सुद्धा त्या भागात स्फोट करण्यात आले आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून कुठल्याच प्रकारचा कायमस्वरूपी रोजगार मिळणार नाही. उत्खनन करून कंपनी परत जाईल तेव्हा आपल्याकडे ना जंगल राहील ना रोजगार तेव्हा खरी उपासमारीची वेळ येईल. या खदानीमुळे आदिवासींच्या संस्कृतीचा नाश होईल. सरकारने अश्या विनाशकारी प्रकल्पाच्या माध्यमातून आमचा विकास साधण्याचे अश्वासन देण्यापेक्षा आम्हाला दर्जेदार शिक्षण द्यावे, मोठ्या विद्यापीठात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती द्यावी, मुबलक आरोग्य सुविधा द्यावे व आमच्या सगळ्या मूलभूत अधिकारांची पूर्तता करावी आम्ही आमचा रोजगाराचा प्रश्न, चांगलं जीवन जगण्याचा प्रश्न स्वतः सोडवू अशी भूमिका सुरजागड पारंपरिक ईलाका गोटूल समितीने व्यक्त केली आहे. २५ ऑक्टोबर रोजी सुरजागड लोह खनिज खदानीच्या ठिकाणी विविध पारंपरिक इलाके, जिल्हा महाग्रामभा स्वायत्त परिषद आणि राजकीय पक्षांच्या सहभागाने होणार असलेल्या आंदोलनात गडचिरोली जिल्ह्यातील अदिवासी, गैर-अदिवासी व देशभरातून युवक, युवती, विद्यार्थी, पर्यावरण प्रेमी, आदिवसी हक्क संघटना व संविधानिक विचार पुढे ठेऊन काम करणाऱ्या समस्त संघटना, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सामील व्हावे, असे आवाहन सुरजागड पारंपरिक ईलाका गोटूल समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
Indefinite sit-in agitation against Surjagad mine