‘अनलॉक’ला आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेचा २०२० चा ‘उत्कृष्ट दिवाळी अंक’ पुरस्कार
नागपूर, ता. २8 : ‘आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना’ आणि ‘आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संग्रहालय’ जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धा २०२० चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. सन २०२० चा 'उत्कृष्ट दिवाळी अंक' पुरस्कार नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या इंक एन पेन पब्लिकेशनच्या 'अनलॉक' दिवाळी अंकाला घोषित करण्यात आला आहे.
अनलॉक दिवाळी अंक हा ‘व्यक्तिमत्व अनलॉक’ या संकल्पनेवर आधारित होता. अतिशय नेटकी मांडणी आणि आकर्षक बांधणीचा हा अंक होता. महाराष्ट्रभराच्या विविध प्रांतातील दिग्गज पत्रकारांनी आणि लेखकांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखातून समाजातील अनेक प्रेरक व्यक्तिमत्त्वाचा प्रवास यात मांडला होता. महाराष्ट्राचे लाडके सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते भारत गणेशपुरे यांनी या अंकाच्या अतिथी संपादनाची धुरा सांभाळली तर आनंद स्मिता हे संपादक आणि रश्मी पदवाड-मदनकर या अंकाच्या प्रबंध संपादक होत्या.
राज धुदाट यांनी या स्पर्धेचे परिक्षक म्हणून काम पाहिले. यावर्षी झालेल्या प्रदीर्घ जागतिक लॉकडाऊन आणि सामाजिकदृष्ट्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे दिवाळी अंक २०२० च्या निकालास विलंब लागला. प्रत्येक वर्षी साजरा होणारा पुरस्कार वितरण सोहळा आणि दिवाळी अंकांच्या संपादकांचे एक दिवअय विशेष अधिवेशन यावर्षी महापूर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केले जाणार नसल्याचे आयोजकांनी सांगितले.
#diwali ank #unlock
११२ वर्षांची दिवाळी अंक परंपरा ही खास मराठी अभिरुचीचे प्रतीक आहे. दिवाळी अंकाची ही परंपरा वेगळ्या थाटणीत सुरू ठेवण्याचं काम आम्ही आनंदाने करत आहोत. ही परंपरा पुढेही अशीच सुरू राहील, अशी माहिती आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेचे कार्यकारी संचालक डॉ. सुनील दादा पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.