पिशोर- पिशोर सिल्लोड रस्त्यावर ट्रॅक्टर व दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातातील जखमी चिमुकल्याची प्राणज्योत शनिवारी सकाळी मालवली. या अपघातातील मृतांची संख्या चार झाली असून ट्रॅक्टर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पिशोर सिल्लोड रस्त्यावर मोहंद्री फाट्यानजीक शुक्रवारी भरधाव ट्रॅक्टर क्रमांक
एम एच-२० एएस-८९२४ ने दुचाकी क्रमांक एमएच-२० ईक्यू-०५८२ ला जोरात धडक दिली. दसऱ्या निमित्त असलेल्या कार्यक्रमासाठी पिशोर येथील सोमिनाथ शेषराव सुरे हा आपली बहिण बाली भीमा चौगुले, भाची ज्योती चौगुले, रेणुका चौगुले व भाचा कार्तिक उर्फ सागर चौगुले आणण्यासाठी चिंचोली लिंबाजी येथे गेला होता. सायंकाळी ६.४५ वाजेदरम्यान घरापासून हाकेच्या अंतरावर भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात बाली चौगुले व ज्योती चौगुले यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर सोमिनाथ सुरे याचा औरंगाबाद घाटीत नेतांना वाटेतच मृत्यू झाला होता. यातील सात महिन्याच्या जखमी कार्तिक याचा उपचारा दरम्यान शनिवारी मृत्यू झाला असून रेणुकावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर मयतांचे नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. शनिवारी कार्तिकच्या मृत्यूची वार्ता कळताच नातेवाईकांचा मोठा जमाव पोलीस ठाण्यासमोर जमा झाला. आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी नातेवाईक करीत होते. सपोनि हरिषकुमार बोराडे, सपोनि देविदास वाघमोडे, उपनिरीक्षक विजय आहेर, सतीश बडे, जमादार किरण गंडे, कदिर पटेल आदींनी आरोपी अटकेत असून ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला आहे अशी नातेवाईकांची समजूत घातली त्यांनतर जमाव शांत झाला. मयत बाली चौगुले, ज्योती चौगुले यांचे नाचनवेल प्राथमिक आरोग्य केंद्रात तर सोमिनाथ सुरे व कार्तिक चौगुले यांचे घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तिन्ही माय लेकांचे चिंचोली लिंबाजी तर सोमिनाथ सुरे याच्यावर पिशोर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान ट्रॅक्टर चालक भगवान सांडू भागवत रा. शफेपुर यास पोलिसांनी अटक केली असून उपनिरीक्षक सतीश बडे अधिक तपास करीत आहेत.