लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी सोबतच लोकाभिमुख कारभार व्हावा
सार्वजनिक सभागृहासाठी 10 कोटी रुपयांचा निधी-उपमुख्यमंत्री अजित पवार
आंबेगाव पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन
पुणे दि.15: लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी सोबतच लोकाभिमुख कारभार आंबेगाव पंचायत समितीच्या नूतन सुसज्ज इमारतीतून व्हावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. घोडेगाव येथे सार्वजनिक सभागृहासाठी 10 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
आंबेगाव पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ.अमोल कोल्हे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आदी उपस्थित होते.
पायाभूत सुविधासाठी निधी कमी पडू देणार नाही असे सांगून
उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले,
आंबेगाव पंचायत समितीची नवी इमारत देखणी व शहराच्या वैभवात घर घालणारी आहे. या इमारतीच्या फर्निचरसाठी आवश्यक निधी देण्यात आला आहे, लवकरच फर्निचरचे काम पूर्ण होईल. नागरिकांचे प्रश्न तेवढ्याच तत्परतेने सोडवले गेले पाहिजेत. या इमारतीतून होणारा प्रत्येक निर्णय सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी यांच्या विकासाला चालना देणारा असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आंबेगाव व परिसरातील आरोग्य, ग्रामविकास,ऊर्जा आदिवासी विकास, जलसंपदा, पर्यटन विभागाशी संबंधित प्रश्नाबाबत आपण पाठपुरावा करणार असून भीमाशंकर विकास आराखड्याबाबत लवकरच बैठक घेत विकास आराखड्याला गती देण्यात येईल. जिल्ह्यात रस्ते विकासाचे अनेक कामे होत आहेत, या भागातून त्यातील अनेक रस्ते जाणार आहेत. त्यामुळे परिसराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
गृहमंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले, आंबेगाव पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपयोग होईल. लोकाभिमुख काम या इमारतीच्या माध्यमातून करता येईल. प्रशासकीय अधिकाऱ्याने सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून काम करावे.
आंबेगाव येथे 34 कोटी रुपये निधी खर्च करून इंग्रजी माध्यमाची शाळा उभी राहिली आहे. 600 विद्यार्थी क्षमता असलेली या शाळेतून नक्कीच दर्जेदार शिक्षण मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी खासदार डॉ.अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पंचायत समितीचे सभापती संजय गवारी यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला उपाध्यक्ष रणजित शिवतारे, पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, श्री.किशोर दांगट, उपसभापती,, प्रांत अधिकारी सारंग कोडीलकर, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे उपस्थित होते.
*शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेचे उद्घाटन*
उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते शासकीय इंग्रजी माध्यमाच्या शाळेचेही यावेळी उदघाटन करण्यात आले. श्री.पवार यांनी शाळेची पाहणी करून सोईसुविधायुक्त शाळेचा या भागातील विद्यार्थ्यांना निश्चित लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांनी शाळेबाबत सविस्तर माहिती दिली.
10 crore fund for public hall - Deputy Chief Minister Ajit Pawar