राज्यातील शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे. ऑक्टोबर महिन्यात ४ तारखेपासून शाळा प्रत्यक्ष सुरू केल्या जाणार आहेत. राज्यातील कोविड संक्रमण स्थिती काहीशी निवळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र नेमके कोणते वर्ग सुरू होणार, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र ४ ऑक्टोबर २०२१ पासून शाळा सुरू होणार असून, या वृत्ताला शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही एका वृत्तवाहिनीशी बोलताना दुजोरा दिला आहे. सर्व कोविड नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
राज्यातील शाळा कधी सुरू केल्या जाणार, या चर्चेला यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. गेले अनेक दिवस शिक्षक आणि समाजातील तज्ज्ञ व्यक्तींकडून शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही वक्तव्य केले होते, की २ ऑक्टोबर २०२१ नंतर कोविड संक्रमण स्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.
दुसरीकडे, अद्याप राज्यातील महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू झालेली नसताना शाळा मात्र आधी सुरू होत असल्याबाबत काही पालक संघटनांनी चिंताही व्यक्त केली आहे.
दरम्यान, शाळा प्रत्यक्ष सुरू होणार असल्या तरी त्या सुरुवातीला ऐच्छिक स्वरुपात असतील, असेही कडू यांनी सांगितले. कोविड नियमांचे पालन कसे करायचे, शिक्षकांचे लसीकरण आदींसंदर्भात येत्या दोन दिवसांत सविस्तर भूमिका जाहीर केली जाईल
विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर (प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक)