अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची मागणी
राजुरा/ प्रतिनिधी
जिवती तालुक्यातील कुसुंबी येथील 24 आदिवासींच्या जमिनी जिवती येथील तत्कालीन तहसिलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी पदाचा गैरवापर करून अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या नावे करून दिले असून ते आता वरोरा येथील तहसिल ला तहसिलदार म्हणून कार्यरत आहेत. सदर तहसिलदार यांचे बड्या राजकारण्यांशी सबंध असल्याने प्रशासन त्यांचे वर गुन्हा दाखल करण्यास दरंगाई करीत आहे असेही महिपाल मडावी यांनी सांगितले आहे. मात्र कायदा सर्वांसाठी सारखा असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ सचिव महिपाल मडावी यांनी दिनांक १३/८/२०२१ ला जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
कुसुंबी येथे 24 आदिवासींच्या जमिनी हस्तांतरणास मनाई असताना तहसिलदार बेडसे पाटील यांनी कंपनीसोबत आर्थिक व्यवहार करून स्वतः फेरफार क्रमांक 248 प्रमाणे अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या नावे करून दिले आहे. सदर फेरफार नियमबाह्य असल्याने रद्द करून आदिवासींच्या जमिनी चा रेकॉर्ड पूर्ववत करावा व अश्या भ्रष्टाचारी, आर्थिक व्यवहार केलेल्या तहसीलदारावर गुन्हा दाखल करून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी महिपाल मडावी यांनी केली असून सदर प्रकरणात कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन करू असेही महिपाल मडावी यांनी सांगितले आहे.