पद्मगंधा प्रतिष्ठान (Pamdgandha Pratisthan) च्या वतीने वैदर्भीय लेखकांची परिचयासह सुचीच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन मा.महापौर दयाशंकरजी तिवारी यांच्या विशेष उपस्थितीत तसेच सामाजिक कार्यकर्त्या आणि कोरोना योद्धा मा.अरुणा ताई पुरोहित यांच्या शुभ हस्ते बाबुराव धनवटे सभागृहात १६ ऑगस्ट रोजी करण्यात आले.
मा.महापौर दयाशंकरजी तिवारी यांनी आपल्या वक्तव्यात पद्मगंधा प्रतिष्ठानच्या या विशेष उपक्रमाला शुभेच्छा देत या कार्यक्रमापासून पद्मगंधाचा ह्या वर्षातील प्रत्येक कार्यक्रम हा अमृत महोत्सवाच्या निमित्याने राष्ट्र समर्पित असेल असे सूचित केले.
आपला इतिहास पुढच्या पिढी पर्यंत पोहचण्याची जबाबदारी ही पूर्णपणे आपली आहे असे मत व्यक्त केले.अशा अनेक सौदामिनी आणि त्यांच्या कार्याचा परिचय कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजासमोर आणता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित "१८२४ ते १९०० या कालखंडातील" स्वातंत्र्य संग्रामातील सौदामिनी" या कार्यक्रमाची संकल्पना शुभांगी भडभडे यांची होती तर संयोजन ज्योती चौधरी यांचे होते. या कार्यक्रमा अंतर्गत ज्या भूमिका एकपात्री प्रयोगातून साकार करण्यात आल्या त्या कलाकारांचे आणि त्या पात्रांचे लेखन करणाऱ्या विजया ब्राह्मणकर ( राणी ईश्वरी कुमारी),सुनंदा साठे ( राणी चेन्नमा ),संगीता वाईकर ( राणी लक्ष्मीबाई),स्वाती मोहरीर ( मैनावती पेशवे),वर्षा विजय देशपांडे ( बीना दास) ज्योती चौधरी ( भारतमाता) या लेखिकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
अतिथी मा.अरुणा पुरोहित यांनी 'स्वातंत्र्य संग्रामातील सौदामिनी' या विशेष कार्यक्रमाचे कौतुक करत असे कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्यात यावे असे मत व्यक्त केले आणि सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन केले .
यावेळी ज्योती चौधरी,साक्षी राऊत,मालिनी अंबाडेकर,ऐश्वर्या डोरले,गीता काळे आणि अंकिता पोहरकर यांनी अतिशय उत्तम सादरीकरण केले. प्रास्ताविक पद्मगंधा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष शुभांगी भडभडे यांनी केले तर सूत्र संचालन प्रभा देउस्कर आणि वर्षा देशपांडे यांनी केले.पद्मगंधा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
Pamdgandha Pratisthan