चंद्रपूरच्या महापौरांची पत्रपरिषद; पत्रकारांच्या प्रश्नांना सफाईदार उत्तरे
चंद्रपूर/ प्रतिनिधी
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांवर मागील सहा महिन्यापासून आरोपांच्या फैरी सुरु आहेत. एक प्रश्न सुटत नाही, तोच दुसरा मुद्दा पाठीमागे लागूनच आहे. आरोपांचे ग्रहण सुटता सुटेना झाले असताना महापौर राखीताई कंचर्लावार यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या तोफगोळ्यासमोर मोठ्या हिमतीने आल्या आणि पत्रकारांच्या प्रश्नांना सफाईदार उत्तरे दिलीत. यावेळी उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृह नेता संदीप आवारी यांचीही उपस्थिती होती.
Cmc Chandrapur Mayor Rakhi Kancharlawar म्हणाल्या, महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून भाजपची सत्ता आहे. भाजपच्या कार्यकाळात खुप चांगली कामे झालीत. त्यामुळे विरोधकांची हवा गोल झाली आहे. माझ्या पहिल्या कार्यकाळत अत्यंत चांगली कामे झालीत. आमचे नेते, माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तेव्हाही कल्याणकारी कामांची यादी मला दिली होती. आताच्या कार्यकाळातही दिली. मात्र, या कार्यकाळात कोरोनाचे संकट गडद असल्याने मी सुत्रे स्वीकारल्यापासून रूग्णसेवेत बराच काळ गेला. काही कामे व्हायची राहून गेली असेल, मात्र त्यातल्या त्यात जी झाली ती नियमाप्रमाणे आणि उत्तम झाली आहे. निवडणुकीवर डोळा ठेवून विरोधक आरोप करताहेत.
200 युनिट मोफत विजेच्या मागणीला आपले समर्थन आहे का? त्या संदर्भात आपण सभागृहात ठराव घेणार का?
- 200 युनिट मोफत विजेचा विषय हा चांगला आहे. त्याला आमचे समर्थन आहे. पण ज्यांनी याची जबाबदारी घेऊन, जनतेला आश्वासन देऊन निवडूक जिंकली आणि सत्तेतही सहभागी झाले, त्यांनी हा विषय मार्गी लावला पाहिजे. आपण काहीच करायचे नाही आणि दुसर्यावर आरोप करायचे असे कसे चालेल. आमचे काम बघून आमदारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून विविध कामांमध्ये दिरंगाई, अनियमितता झाल्याचा आरोप करणार्या आमदार किशोर जोरगेवार यांनी आधी ज्या घोषणेच्या भरवश्यावर मतदार संघात मते मागितली आणि निवडून आले, त्या 200 युनिट मोफत विजेचे काय झाले? चांगल्या कामांना विकास विरोधी असणार्यांचा विरोध होतोच, त्यात नवल काय?
व्हीआयपी ११११ वाहन क्रमांक घेतला, आपल्यावर आरोप होत आहेत, आपले मत काय ?
- महापौरांसाठी ‘अल्फा नेक्सा कंपनीची एक्सएल ६’ वाहन खरेदी केल्यानंतर ११११ या वाहन क्रमांकासाठी जी रक्कम मोजली गेली, ती प्रशासकीय बाब आहे. हाच वाहन क्रमांक मिळावा, यासाठी आम्ही आग्रह धरला नाही. हे महापौरांचे वाहन आहे. कार्यकाळ संपल्यावर हे वाहन आणि त्याची नंबर प्लेट मी घरी घेऊन जाणार नाही. आज मी पदावर आणि उद्या कुणी दुसरा येईल. त्या ‘व्हिआयपी’ क्रमांंकाचाही उपयोग मला आजन्म होणार नाही. खरे तर, मी गाडी आणि त्याचा तो खास क्रमांक प्रशासनाला मागितला नाही. कोणतीही कामे पदाधिकारी करतात आणि कोणती कामे प्रशासकीय अधिकारी करतात, हेे आधी आरोप करणार्यांनी जाणून घ्यावे आणि मग आरोप करावेत. त्यामुळे वाहन खरेदी आणि नंबर प्लेटसाठी महापौर किंवा पदाधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केला, असे म्हणणे चुकीचे आहे.
आपले आंदोलन नेमके कशासाठी आणि वेळेवर का ठरले?
- आमचे आंदोलन हे पूर्व नियोजितच होते. चंद्रपूरचे आमदार निवडून येण्या आधीपासूनच खोटी आश्वासने अन भुलथापा देत आहेत. २०० युनिट वीज मोफतची खोटी भूल देऊन विधानसभा जिंकली. आता कोरोनाच्या महामारीत आमदार खोटी आश्वासने अन भुलथापा देत आहेत. हॉस्पिटल उभारल्याची प्रसिद्धी मिळविली. वास्तविक पाहता मनपाचे आधीपासूनच इथे कोविड केअर सेंटर सुरु आहे. केवळ पाटी बदल करायची आणि उदघाटन करायचे. आमदारांनी डॉक्टर नसलेला दवाखाना सुरु केला. वीजमाफीचा विषय बासनात गुंडाळला. केवळ स्वतःची मालमत्ता वाढविण्यावर भर आहे. जनतेच्या हिताच्या प्रश्नांना तिलांजली दिली आहे.
अमृत पाणी पुरवठा योजनेची काय स्थिती आहे ?
- अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम हे नियमाप्रमाणेच होत आहे. कंत्राटदारांनी 12 झोन ठरवले आहे आणि टप्प्याटप्प्याने एक-एक झोनचे काम सुरू आहे. ज्या ज्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत, त्या आम्ही कंत्राटदाराकडून सोडवून घेत आहोत. 200 कोटीचा असा कुठलाच घोटाळा मनपात झाला नाही. त्याबाबत जी काही चौकशी होणार असेल, ती होईल. डॉ. मंगेश गुलवाडे यांच्यावरील आरोपांबाबत चौकशी होत आहे. त्यांच्यावर रिकव्हरी काढली गेली आहे याचाच अर्थ आमचा काही हस्तक्षेप नाही. चौकशीअंती खरे काय ते समोर येईलच. !
Cmc Chandrapur Mayor Rakhi Kancharlawar