युपीत लोकशाहीत ठोकशाही....!
निवडणूक लोकशाहीची शक्ती. ती खरी रक्तवाहिनी. ती दुषित केली जाते. त्यात चार स्तंभांचा कमीअधिक हातभार. रक्षकच हात बांधून बसलेत. सांमत शिरजोर झाले. लोकशाहीचे सोपस्कार सुरु आहेत. तिचे पाच वर्षातून एकदा आगमन. वाजत गाजत तिचं स्वागत व्हावं. सामान्य माणसाचं तेच एक शस्त्र. कामाच्या माणसांना सत्ता सोपविणं. सज्जनांना वाव देणं. अयोग्य असतील. त्यांना बाहेरचा रस्ता दाखविणं. हे काम मतदार राजा करीत आला. चोख जबाबदारी पार पाडत आला. त्यालाच आता वेठीस धरलं जातं. तो निसटला. तर त्याने निवडेला प्रतिनिधी पकडा. आता हा नवा ठोक मार्ग आला. युपीत दिसला. मतदारांचा अधिकार हिसकावण्याचा नवा चोरमार्ग. अलिकडे ईव्हीएम आली. तिच्या नावे शिंमगा सुरु झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतपेटीच आहे. तिलाही दृष्ट लागली. त्या मतपेटीपर्यंत कोणाला जावू द्यावयाचं. अन् कोणाला रोखावयाचं . हा नवा खेळ सुरू झाला. जिसकी लाठी ,उसकी भैस असा वाकप्रचार आहे. त्याचा वापर पश्चिम बंगालात झाला. ते लोण आता उत्तर प्रदेशात आलं. विरोधक ओरडत आहेत. सत्ताधारी स्वागत करीत आहेत. 23 जिल्ह्यात निवडणुकांचा गळा आवळला . त्यासाठी पैसा, पळवापळवी, हिंसा, लाठीमार झाला. पदांचा लिलावही झाला. सत्तेचा सर्रास दुरूपयोग. विरोधकांना धाक. उमेदवारी अर्ज दाखल करावयाचं नाही. धमकीनं चालत नसेल. तर मारपीट. त्यालाही जुमानत नसेल. तर अपहरण . या सर्व अडथळ्यांच्या शर्यंती. त्या पार करून कोणी आला. तर त्यांचा उमेदवारी अर्ज सरकारी कार्यालयात जाणार नाही. यासाठी केंद्रांवर गुंड. तेवढेच पोलिस. त्यांची आतून फूस. ते बघ्यांच्या भूमिकेत. चिरहरण सुरू असताना खाकी वर्दी बघत होती. व्हिडीओ आल्यावर कारवाई. महिलेची साडी फेडली जातं. तिचा बखोटा पकडून ओढलं जातं. हे प्रकार अनेक असावेत. एका घटनेचा व्हिडीओ आला. दहशतीचा धाक इतका. बसपा नेत्या मायावतींनी अगेदरच शस्त्र खाली ठेवलं. ना जि.प. अध्यक्षाच्या निवडणूका लढविल्या. ना पं.स.प्रमुखाच्या निवडणुका .सपाने लढविल्या हाती फार लागलं नाही. सर्कल सदस्य भाजपपेक्षा जास्त निवडून आल्याचा दावा केला होता. प्रमुखांच्या निवडणुका झाल्या. तेव्हा 75 पैकी 63 प्रमुख भाजपचे आले.एकतर्फा विजय.
असंही घडतं...!
पंचायत सर्कल प्रमुखाच्या निवडणुकीत तर गजब घडलं. एकूण 825 प्रमुख निवडावयाचे होते. 1778 उमेदवारी अर्ज आले. त्यातील 349 अविरोध निवडून आले. उरलेल्या 476 जागांसाठी 1174 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी भाजपने 316 प्रमुख पदांवर कब्जा केला. भाजपने एकूण जागांपैकी 635 जागा जिंकल्या. तर विरोधकांच्या हाती केवळ 190 प्रमुख हाती लागले. त्यात भाजप मित्र पक्षांचे किती हे योगींनाच ठाऊक .
आठ महिन्यानंतर उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका आहेत. आता पार पडलेल्या निवडणुका त्यांची रंगित तालीम होती. गाव तालुका, जिल्हा पुढारी मैदानात होते. ते लोकशाहीचा गळा आवळत होते. तेव्हा सत्तेतील मंडळी तमाशा बघतं होती. बंगालात ओरडणारे. गळेही बंद. पश्चिम बंगालमधून एक तरूण मंत्री घेतला. त्या गृहराज्य मंत्र्यांवर 13 गंभीर गुन्हे आहेत. कलम 307 चे दोन गुन्हे आहेत. आडनाव त्याचं प्रामाणिक. देशाला असा गृहराज्य मंत्री देणाऱ्यांना काय म्हणावं. शब्द शोधा अन् त्याचा तुम्हीच वापर करा. हे तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य.
अविरोधाची नकल...
ऐनकेन प्रकारे विजय हवा. त्यासाठी साम, दाम, दंडाचा वापर. हे चुकीचे संकेत. लोकशाहीला मारक . पश्चिम बंगालमध्ये गळा काढत होते. त्या भाजपच्या राज्यात चालयं काय...! तर गळा काढणारेच लोकशाहीचा गळा आवळत आहेत. 50 टक्यांवर उमेदवार अविरोध निवडून आले. हे शक्य आहे. त्यासाठी हवी योगीशाही असं म्हणावं लागेल. ग्रामपंचायत निवडणुकीत साध्या सदस्य पदाच्या निवडणुका अविरोध होत नाहीत. हे सर्वाचे अनुभव. उत्तर प्रदेशात जिल्हा परिषद प्रमुख , पंचायत प्रमुख अविरोध निवडून येतात. पश्चिम बंगालमध्ये असेच चालू होते. तेव्हा झाडून भाजपचे नेते गुंडशाही, झुंडशाही,दगडशाही नावाने टोले लावित. त्याचा मिनीट्रेलर उत्तर प्रदेशात दिसला. अविरोध उमेदवार निवडून येतात. हे गणित थोडंफार राजकारण समजत. त्या सर्वांना सहज कळतं. पश्चिम बंगालमध्ये जे घडलं. काहीसा तशाच प्रकार उत्तर प्रदेशात दिसला. या निवडणुकाच्या अगोदर खूप धावपळ झाली. बैठकांना ऊत आला होता. नागपूरवाल्यांनी सुध्दा वरचढीने भाग घेतला .त्या बैठकींत या निवडणुकांची स्क्रिप्ट लिहली गेली. अंमलबजावणी योगींवर सोपविली. या परिक्षेत योगी पास झाले. दुसरीकडे लोकशाहीचे बारा वाजले. विधान सभा निवडणुकीत असंच घडणार काय. हा चिंतेचा विषय. सत्ताखोरांना मात्र विरोधकांची जिरवल्याचा आनंद.
- भूपेंद्र गणवीर
...............BG.................