वापरलेल्या वीज देयकाचे पैसे मागील चार महिन्यापासून न भरणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील, सेलू येथील वीज ग्राहकाने महावितरणच्या शाखा अभियंत्यास शिवीगाळ करून मारहाण करण्याची घटना बुधवार दिनांक २८ जुलै रोजी घडली. सिंदी पोलिसांनी हल्लेखोर आरोपीस अटक केली आहे.
महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, फरहान सय्यद राहणार खडकी ता सेलू या वीज ग्राहकाने मार्च-२०२१ पासून वीज देयकाचे पैसे भरले नव्हते. महावितरणकडून वीज ग्राहकास वारंवार आवाहन करूनही वीज ग्राहक फरहान सय्यद प्रतिसाद देत नसल्याने महावितरणच्या केळझर येथील शाखा अभियंता धम्मदीप जिवतोडे यांनी आपले कर्मचारी घेऊन वीज पुरवठा करण्यासाठी पोहचले. दरम्यान आरोपी वीज ग्राहकाने शाखा अभियंता धम्मदीप जिवतोडे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे वर्धा येथील कार्यकारी अभियंता स्वप्नील गोतमारे आणि सेलू उप विभागाचे उपकार्यकारी अभियंता घटनास्थळी पोहचले.
सदर मारहाण घटनेप्रकरणी महावितरणकडून आक्रमक भूमिका घेत सिंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. महावितरणकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी वीज ग्राहक फरहान सय्यद याच्या विरोधात भादंवि ३५३,३३२,१८६, २९४,५०४,५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस तात्काळ अटक केली.
आठवडाभरात वर्धा जिल्ह्यात दुसऱ्यांदा महावितरणचा शाखा अभियंत्यांवर हल्ला करून मारहाणीची घटना घडली आहे. महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करणे हा गंभीर गुन्हा असून गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीस कारावास झाल्याच्या घटना या अगोदर घडल्या आहेत.मागील आठवड्यात वर्धा शहरातील हनुमान नगरातील तीवारी कुटुंबातील पाच सदस्यांनी महावितरणचे शाखा अभियंता सचिन उईके यांच्यावर हल्ला करून मारहाण केली होती. न्यायालयाने देखील घटनेचे गाम्भीर्य लक्ष्यात घेऊन आरोपीना अद्याप जमीन मंजूर केला नाही.