Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जुलै ०३, २०२१

माझा वैद्यकीय शाखेतील पी.एच.डी. चा प्रवास : डाँ. संजय दाभाडे #Dr.Sanjay-Dabhade



डाँ. संजय दाभाडे सरांनी त्यांच्या वैद्यकीय शाखेतील पी.एच.डी बाबत सांगितलेले मनोगत   तब्बल ७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रयत्नानंतर अखेरीस पी.एच.डी. Ph.D. डिग्री मिळाली.  हि 'फॅकल्टी ऑफ मेडिसिन ' मधील म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील Ph.D. आहे. अनेक चाळण्या पार करत २०२१ मध्ये प्रबंध विद्यापीठास सबमीट झाला. अन्य राज्यातील व राज्या बाहेरील विषय तज्ञ ह्यांनी प्रबंधास मान्यता दिल्या नंतर अखेरीस २२ जून रोजी वैद्यकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या समोर ओपन डिफेन्स ( थेसिस सादरीकरण व तोंडी परिक्षा ) झाले.  

  आणि अनायसे नंन्तर लगोलगच पदवीदान समारंभ संपन्न झाल्यानें २९ जून रोजी " पी.एच.डी. इन फॅकल्टी ऑफ मेडिसिन " (डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन फॅकल्टी ऑफ मेडिसिन) हि डिग्री मिळाली.

     माझ्या थेसिस ची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या 

" विद्येविना मती गेली ....." ह्या अखंडाने केली आहे.

महात्मा फ़ुले , आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज नी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवांमुळेच खरं तर माणूस म्हणून जगण्याची नी इथपर्यंत प्रवास करण्याची संधी मिळाली आणि शिक्षण व ज्ञानाचा उपयोग केवळ व्यक्तिगत जगण्यासाठी नव्हें तर शोषित वर्गासाठी करण्याची सम्यक दृष्टी मिळाली. त्या  महामानवांना नतमस्तक होऊन मनस्वीअभिवादन.

हा प्रवास अर्थात एकट्याचा नव्हताच. माझी पत्नी डॉ.संगीता ( प्राध्यापक व विभाग प्रमुख , औषधशास्त्र विभाग , गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज , बारामती ) हिचा ह्यात अक्षरशः सिंहाचा वाटा होता. तिच्या सक्रिय सहभागाशिवाय हें शक्य नव्हते. संशोधन , अभ्यास , थेसिस रायटिंग हें आम्ही खरच एन्जॉय केलं, अनेकदा अनेक मुद्द्यांवर वाद होत , परंतु त्या वादांमुळेच प्रत्येकवेळी काहितरी चांगलं सुचत असें नी त्यामुळे खूप फ़ायदा थेसिस लिहितांना झाला.

 माझी आई , जी सध्या अल्झायमर सारख्या आजाराने वेढली आहे , तिच्याच अपार कष्टातून , त्यागातून आम्ही सगळी भावंडं शिकू शकलो. गावाकडं भल्या पहाटे उठून म्हशींच्या गोठ्यात जाऊन दूध काढून , गल्लोगल्ली स्वतां दूध घरोघरी जाऊन विकणारी माझी आई , गोवऱ्या डोक्यावर घेऊन गावात गोवऱ्या विकणारी माझी आई , दूरवर असणाऱ्या शेतांत जाऊन गुरांसाठी चारा कापून आणणारी नी रात्रीपहाटे हातगाडी स्वतः ढकलत दिव्य पार पाडणारी आमची आई. 

तीच्या प्रचंड ध्येयासक्तीची प्रेरणा , कि ज्यामुळे आम्हां भावंडांना काही मिळवता आलं. अल्झायमर मुळे तीला फारसें काहि लक्षांत येतं नाहीं , पण तीचे आशीर्वाद मात्र धड्पडण्याची प्रेरणा देतातं. 

  माझ्या पी.एच.डी. च्या गाईड ( सध्या वय ७२ वर्षे ) डॉ.शिदोरे मॅडम.... आमच्या त्या प्राध्यपक व विभागप्रमुख होत्या , अलीकडे रिटायर झाल्या होत्या. त्यांनी सतत मार्गदर्शन केलं , चूका बरोबर हेरल्या परंतु सुधारायला पाठींबा नी बळ दिलं. त्या विषयांतील अत्यंत तज्ञ आणि खूप व्यापक दृष्टी बाळगणाऱ्या, जे.कृष्णमूर्तींसारख्या विचारवंतांच्या विचारांनी प्रभावित असणाऱ्या, आणि आजही शेती करणाऱ्या,   मातीचं भान असणाऱ्या. त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांनी मला दिलेलं मोकळं - ढाकळं स्वातंत्र्य खूपच मोलाचं.

त्याशिवाय हा साडेसात वर्षांचा प्रवास शक्य नव्हता. 

  थेसिस पूर्ण करून घेण्यासाठी सतत पाठीमागे लागणारे , आलेले सर्व अडथळे स्वतः जबाबदारी घेऊन पार पाडून देणारे , प्रत्येक टप्प्यावर माझ्या मागं ठामपणे उभं राहणारे, 

अगदी सुरुवाती पासून तें डिग्री हाती येईपर्यंत प्रत्येक पायरीवर मदत नव्हे तर पुढाकार घेणारे नी आमचा विभाग एक कुटुंब मानणारे माझे विभागप्रमुख व माझें मित्र डॉ.अभिजित टिळक सर. त्यांच्याशिवाय एक पाऊल सुध्दा पुढं टाकता आलं नसतं. 

 माझ्या विभागातील माझें सहकारी नी खरं तर माझें गुरू कि जें एक अप्रतीम शिक्षक आहेत , ज्यांनीं मला माझा विषय शिकवला , तें डॉ.बी.टी .राणे सर. त्यांची सतत साथ लाभली ....आम्ही दोघांनी एकत्र पी.एच.डी ला ऍडमिशन घेतली , त्यांच्यावरही अनेक संकटं आली , परंतु त्यांवर मात करत त्यांनी माझ्या  दोन वर्षे आधीच पी.एच.डी.चं दिव्य पार केलं.

आमचे विभागाचे आदरणीय डॉ.डांगे सर , डॉ.सरिता , डॉ .सीमा , डॉ .बर्डे मॅडम ह्यांनी सतत प्रोत्साहन दिलं , मार्गदर्शन केलं.

    माझे वडील बापू , माझी भावंडं विजय , शारदा , उषा , अजय , आशू ,निशू , सतीश ह्यांचा पाठींबा तर अत्यंत मोलाचा राहिला.

एकंदरीत पी.एच.डी. पार पाडण्याचा हा प्रवास एकट्याचा कधीच नव्हता , माझं कुटुंब , भावंडं , माझें गाईड ,माझें विभागप्रमुख व विभागांतील सहकारी , चळवळीतील असंख्य मित्रांचा पाठींबा ......    ह्यातून अखेरीस पी.एच.डी. चे दिव्य पार पडलें.

अनेकदा असं होई कि चळवळीतील विविध प्रश्नं , अभ्यास नी लेखन आणि दुसरीकडे पी.एच.डी. चा अभ्यास ह्यांत सतत द्वंद्व  निर्माण होत असें. माझ्याकडून नेहमीच चळवळीला प्राधान्य दिलं जाणं नी त्यामुळे पी.एच.डी. मागं पडत राहाणं असंच सतत नी शेवट्पर्यंत घडतं राहिलं. 

अगदी अलिकडे म्हणजे पी.एच.डी. चें फ़ायनल प्रेझेन्टेशन तोंडावर असतांना दुसरीकडे करोना पँडेमिक विषयी अभ्यास , पेशंट्स ट्रीट करणं , असं सतत सुरू होतं.  व्हॅक्सीन चं राजकिय अर्थकारणावर अभ्यास करुन त्यांवर अगदि अलिकडे दैनिकं सकाळ मध्ये लिहीलं तर दुसरीकडे पदोन्नतीतील आरक्षण ह्या मुद्द्यावर रस्त्यावरील संघर्ष नी त्यांबाबत अभ्यास ,लेखन नी प्रबोधन हि मोहिम सुरुच होती नी आहे. 

पी.एच.डी. च्या अभ्यासातून चळवळीकडे नी चळवळीच्या आवेगातून पुन्हां पी.एच.डी . कडे हाच प्रकार माझ्यासाठी खरं तर सर्वाधिक अवघड होता नी चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याला अश्याच द्वंद्वातून जावं लागतं. 

 असो , 

  अखेरीस काल पी.एच.डी. डिग्रीचं सर्टीफिकेट हातांत आलं नी त्यातून मिळणारं सगळ्यांत महत्वाचं समाधान म्हणजे मी चळवळीतील कामास नी त्यासंबंधीच्या अभ्यास व लिखाणासाठी मोकळा झालो.....

बरीच कामं , बराच अभ्यास नी बरंच लिखाण करायचं आहें.....मोफ़त क्लिनीक , वस्तीतील मुलांसाठीची जीवनशाळा ह्या विधायक कामांना गती द्यायची आहें......


 डॉ.संजय दाभाडे, पुणे

        9823529505

        sanjayaadim@gmail.com


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.