चंद्रपूर, दि. २९ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सभागृहात नगरसेवक नंदू नागरकर यांनी विनापरवानगी प्रवेश करत घोषणाबाजी करून गदारोळ केला. इतकेच नव्हे तर पीठासीन असलेल्या महापौरांचे व्यासपीठ ठोकत इशारा देण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी नगरसेवक नंदू नागरकर यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
गुरुवार दिनांक २९ जुलै रोजी दुपारी एक वाजता चंद्रपूर शहर महानगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारतीतील राणी हिराई सभागृहात सर्वसाधारण आमसभा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास खात्याने दिलेल्या कोविड-१९ च्या निर्देशान्वये सदर आमसभा पदाधिकारी आणि गटनेते वगळता उर्वरित सर्व नगरसेवकांसाठी आभासी माध्यमातून घेण्यात आली. मात्र सभागृहातील नियमांचे उल्लंघन करीत गैरअर्जदार नंदू संबाजी नागरकर, नगरसेवक, चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर यांनी सभागृहात प्रवेश करत घोषणाबाजी करून गदारोळ केला. इतकेच नव्हे तर पीठासीन असलेल्या महापौरांचे व्यासपीठ ठोकत इशारा देण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पीठासीन असलेले स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता गैरअर्जदाराने त्यांच्यावरच हात उगारत धक्कामुक्की केली.
ही बाब स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहासाठी खेदजनक असून, महिला महापौर म्हणून असुरक्षितता निर्माण झाली आहे. गैरअर्जदार यांनी केलेले कृत्य सभागृहासाठी अवमानजनक असून, गैरअर्जदार यांच्या विरोधात सभागृहात बेकायदेशीर प्रवेश करणे, पीठासीन महापौरांचा अवमान करणे, कोविड नियमांचे उल्लंघन करणे, सभागृहात मोठ्या आवाजात घोषणाबाजी करणे, फलक दाखविणे, स्थायी समिती सभापती यांना धक्काबुक्की करणे आदी कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केली आहे.
पोलीस स्टेशन येथे निवेदन देतांना उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृहनेता संदीप आवारी, नगरसेवक संजय कंचर्लावार, गटनेता अनिल रामटेके, नगरसेविका छबूताई वैरागडे, नगरसेवक देवानंद वाढई, नगरसेविका शाम कनकम, नगरसेवक प्रदीप किरणे आदी उपस्थित होते.
नागरकरांचे निलंबन, अन्य नगरसेवकांवर शिस्तभंग
मनपा सभागृहात सर्वसाधारण आमसभा सुरू असतान विना परवानगी प्रवेश करीत गोंधळ घातल्याप्रकरणी नगरसेक्क नंदू नागरकर यांना निलंबित करावे. सुनीता लोढिया, संगीता भोवर, विना खनके, ललिता रेवेल्लीवार, अली अमजद मंसूर, नीलेश खोब्रागडें, सकिना अंसारी आदी नगरसेवक विनापरवानगी उपस्थित झाले. त्यामुळे त्यांच्यावर कोविड नियमानुसार शिस्तभंग केल्याप्रकरणी कारवाई करावी. नगरसेवक सचिन भोवर यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, असे निर्देश महपौर राखी कंचर्लावार यांनी दिले आहेत.