बाधित शेतकऱ्यांच्या हस्ते फित कापून रस्त्याचे उद्घाटन
जुन्नर /आनंद कांबळे
पुणे नाशिक महामार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० च्या नारायणगाव (ता. जुन्नर) बाह्यवळण रस्त्याचे आज दिमाखदार सोहळ्यात भव्य उद्घाटन करण्यात आले.
या विभागाचे खासदार डॉ अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये तसेच या बाह्यवळण रस्त्यामध्ये शेतजमीन गेलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या हस्ते फित कापून तसेच आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून, श्रीफळ वाढवून व पारंपरिक वाद्यांच्या निनादात दिमाखदार उद्घाटन करण्यात आले.
काल दिनांक १६ रोजी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व माजी आमदार शरद सोनवणे व अनेक शिवसैनिकांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यमान खासदार व आमदारांवर जोरदार टीका करण्यात आली होती. यावर विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हे आज काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. या अनुषंगाने आज झालेल्या कार्यक्रमात खासदार डॉ. कोल्हे यांनी गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प, पुणे नाशिक महामार्गा वरील चाकण, मोशी येथील उड्डाणपूल तसेच रस्त्याचे रुंदीकरण व चौपदरीकरण आदी विकास कामांचा व केलेल्या कामाचा आढावा घेत माजी खासदारांनी आपल्या वयाच्या मानाने आता पोरखेळ करू नये अशी टीका केली.
या कार्यक्रमात आमदार अतुल बेनके यांनी केलेल्या कामाचा आढावा घेत आम्ही प्रत्येक वेळी महाविकास आघाडीचा धर्म पाळतो मात्र समोरच्यांना ते मान्य नसेल तर आम्ही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार. आम्ही देखील आमची कामे प्रामाणिकपणे करत आहोत असे सांगितले.
यावेळी बाजार समितीचे सभापती संजय काळे, जिल्हा परिषदेचे सदस्य पांडुरंग पवार, शरद लेंडे, आशाताई बुचके, मोहित ढमाले, अंकुश आमले, गणपतराव फुलवडे, दिलिप मेदगे, अनंतराव चौगुले, अनिल मेहेर, रमेश भुजबळ, राजश्री बोरकर, तुळशीदास भोईर, पंचायत समिती सभापती विशाल तांबे, तहसीलदार हनुमंत कोळेकर, दिलिप कोल्हे, संतोषनाना खैरे, बाळासाहेब पाटे, अमित बेनके, गणेश वाजगे, सरपंच राजेंद्र मेहेर,अमोल लांडे,मुकेश वाजगे, रोहिदास केदारी, वैजंती कोऱ्हाळे, सुजाता डोंगरे, पुष्पा खैरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी माजी आमदार शरद सोनवणे यांच्यावर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली. यावेळी आशाताई बुचके यांनीदेखील नारायणगाव बाह्यवळण रस्त्यामध्ये आपण शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष केला असल्याचे सांगितले.
याप्रसंगी शरद लेंडे, गणपतराव फुलवडे, आनंदराव चौगुले, दिलीप मेदगे आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊ देवाडे यांनी केले. तर आभार विकास दरेकर यांनी मानले.