शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) : गेल्या एका वर्षात केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल व गॅस सिलेंडर मध्ये मोठ्या प्रमाणात दरवाढ केल्याने सामान्य नागरिकाचे कंबरडे मोडले आहे. अशा दरवाढीच्या विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे दरवाढ कमी करण्याकरिता तहसिलदारामार्फत केंद्र सरकारला निवेदन दिले आहे.
गगनाला भिडलेली महागाई तसेच कोरोनाने आर्थिक बजेट विस्कटित केला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर तसेच खाद्यपदार्थ यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात महागाई वाढल्याने सामान्य नागरिकांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यातच काही नागरीकांचा रोजगार गेला आहे अशा परिस्थितीत सतत वाढणारी महागाई कमी करण्यात यावी. यासाठी देशाचे पंतप्रधान तसेच केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांना तहसीलदार महेश शितोळे यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे विवेक सरपटवार, सुधीर सातपुते, राजू बोरकर, अजय रामटेके, जगन दानव, विशाल कांबळे, प्रकाश अस्वले आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.