Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जून २४, २०२१

अनुसूचित जातीतील १० वीच्या परीक्षेत ९० टक्के गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार २ लाखांचे अनुदान; धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय Dhananjay Munde





११ वी व १२ वी मध्ये उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी दरवर्षी दिले जाणार एक लाख रुपये; आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना होणार लाभ


मुंबई दि.२४ जून - अनुसूचित जातीतील १० वीच्या परीक्षेत ९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी ११ वी व १२ वी या दोन वर्षात प्रत्येकी १ लाख प्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी मार्फत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केला आहे.


दरम्यान या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे.


अनुसूचित जातीतील गरीब कुटुंबातील मुलांना MH-CET, JEE, NEET यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पूर्वतयारीसाठी ही रक्कम लाभदायक ठरणार आहे. याबाबत विद्यार्थी व पालक संघटनांकडून करण्यात येणारी मागणी पाहता ही योजना लागू करण्याबाबत धनंजय मुंडे यांनी निर्देश दिले होते. बार्टीच्या ३० व्या नियामक मंडळाची दिनांक २१ जून रोजी बैठक पार पडली असून या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू करण्यात येत असलेल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न २.५ लाखांच्या आत असणे अनिवार्य असणार आहे. तसेच शासकीय सेवेत नोकरीला असणाऱ्या पालकांच्या पाल्यांना ही योजना लागू असणार नाही. उत्पन्नाचा व जातीचा प्रमाणित दाखला देणे अनिवार्य असणार आहे. विशेष म्हणजे या योजनेमधील लाभार्थी संख्या अमर्यादित असणार आहे! अशी माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली आहे.


असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या, कमी पगारावर किंवा कंत्राटी स्वरूपात किंवा खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार असून, या योजनेची पारदर्शक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांची असणार आहे. या योजनेचा लाभ तळागाळातील गरीब कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना आपले भविष्य घडवण्यासाठी मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून निश्चितच ही योजना सफल करू, असा विश्वास सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.