Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जून ०७, २०२१

नरेगा कामावर मजूर उपस्थितीत चंद्रपूर जिल्हा राज्यात दुस-या क्रमांकावर

जिल्ह्यात 1495 कामांवर 62408 मजुरांची उपस्थिती

चंद्रपूर, दि. 7 जून : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत संपुर्ण जिल्हयात ग्रामपंचायत स्तरावर मोठया प्रमाणात कामे सुरु असल्याने ग्रामीण जनतेला कोरोना महामारीच्या काळात मोठा आधार मिळाला आहे. जिल्ह्यात 1495 कामांवर एकूण 62408 मजुरांची उपस्थिती असून, मजुरांच्या उपस्थितीबाबत चंद्रपूर जिल्हा राज्यात दुस-या क्रमांकावर आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आज रोजी जिल्हयात विविध प्रकारची कामे सुरु आहे. यात वृक्ष लागवडीची - २९१ कामे, जलसिंचनाची- ८, जमीन सुधारणेची - १९, जल संधारणाची - ६७, पाणीसाठा नुतनीकरणीची -५१, पुर नियत्रणांची - २८, वैयक्तीक स्वरूपाची - ९६९ आणि ग्रामीण व शेत पांदन रस्त्यांची ६१ असे एकूण १४९५ कामे सुरु असून या कामावर एकूण ६२४०८ इतके मजुर काम करीत आहे.

आजच्या कोरोनाच्या व लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण मजुरांच्या हातचे काम गेल्याने त्यांच्या हाताला गावांतच काम उपलब्ध करुन देण्याचे महत्वाचे काम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेने केल्याने व केलेल्या कामांची मजुरी १५ दिवसांच्या आत मजुरांच्या बँक खात्यात जमा होत असल्याने जिल्हयातील संपूर्ण मजुर वर्ग समाधानी असल्याचे दिसून येत आहे.

चालु आर्थिक वर्षात एकूण ३ लक्ष १० हजार ८०७ मजुरांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेने रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. शासनाकडून प्राप्त झालेले मनुष्यदिन निर्मितीचे चालु आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट ३८.१५ लक्ष असून ते १०० टक्के पूर्ण करण्याचा मानस आहे. तसेच ग्रामीण भागातील आर्थिक उन्नतीच्या विविध वैयक्तीक व सार्वजनिक लाभाच्या योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सतत राबविल्या जात आहे.

कोरोना महामारीच्या काळात नरेगामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांना रोजगार उपलब्ध झाला व लोकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी नरेगा विभागामार्फत फळबाग लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात येत आहे, असे जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले म्हणाल्या.

जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले म्हणाले, कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर मोठ्या प्रमाणावर कामांचा सेल्फ तयार करण्यात आला. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कामाच्या ठिकाणी कारोनाचे सर्व नियम जसे मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे व सॅनिटायझर अथवा साबनाने हात धुणे इत्यादी नियमांचे पालन करण्यात आले. तसेच पुढील काळात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून नरेगाच्या कामावर जिल्ह्यात ठिकठिकाणी ॲन्टीजन टेस्ट कॅम्पही घेण्यात आले.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.