नागपूर, ता.20 : देणगीदार खूप आहेत पण त्यासाठी विश्वास आणि आपली देणगी सत्पात्री आहे याची खात्री झाली की गरजूंना सहकार्य करणे सहज होते, सेवा सहयोग फौंडेशनशी त्यातून आम्ही जुळलो. आजवर सुमारे 833 विद्यार्थी आर्थिक सहाय्याने पुढे गेले.107 विद्यार्थी उत्तम नोकरीत आहे. आजचा विचार केला तर विविध वैद्यकीय शाखांमध्ये शिक्षण घेताहेत. आमच्या संस्थेत 50 कार्यकर्ते काम करतात, अशी माहिती, रविंद्र कर्वे यांनी येथे बोलताना दिली.
लोकसहभागातून निधी संकलित करून विधायक कार्यासाठी वापरण्याची अनोखी कल्पना राबवतात, अशा रवींद्र कर्वे यांच्याशी ग्रामायणने ज्ञानगाथा मध्ये आज भेट घडवून आणली, त्यात ते बोलत होते.
कर्वे पुढे म्हणाले, साधारण शिक्षणाचे वातावरण असलेले कुटुंब, त्यांची आर्थिक निकड, विद्यार्थ्याची गुणवत्ता, तो शिक्षण घेणार असलेल्या शिक्षण संस्थेची मान्यता आणि देणगीचा योग्य उपयोग होईल याची खात्री झाल्यावरच आम्ही सहकार्य करतो. त्यात मदत किंवा इतर काही भाव नसतो तर ज्ञानार्जनासाठी उत्सुक असणाऱ्याला गरजेची पूर्ती एवढीच भावना असते. आपली निकड भागली तशी इतरानाही कधी भासली तर त्यासाठी पुढे यावे अशी भावना त्या विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण व्हावी असा प्रयत्न असतो. या शिवाय ज्यासाठी देणगी मिळालेली आहे त्यासाठीच तीचा वापर व्हावा असे स्पष्ट केले जाते.
आजवर तरी आम्हाला याचा उत्तम अनुभव आला. काही विद्यार्थी तर या महिन्यात अमुक महिन्यात अमुक रक्कम अतिरिक्त असल्याने पुढच्या महिन्यात तेवढी कमी द्यावी असेही सांगताना आढळले.
देणगीदार शोधण्याची वा कुणाला मागण्याची गरज आम्हाला आजवर भासली नाही. कारण त्यातला कमालीचा पारदर्शीपणा आणि प्रसंगानुरूप देणारे, घेणारे आणि त्यांचे पालक यांचे एकत्रीकरण. शिवाय हीच मंडळी परस्पर चर्चातून संभाव्य देणगीदारांना माहिती देतात. त्यांचे फोन आले की आम्ही संपर्क करून संपूर्ण माहिती समोर ठेवतो. त्यांच्या इच्छेप्रमाणे देणगी दिली जाते. देणगीसाठी योग्य विद्यार्थी निवडीचे जिकरीचे काम शिक्षण संस्थातील शिक्षक प्रारंभी करीत. आता याचा लाभ घेतलेले, त्यांचे पालक आप्तस्वकीयच करतात.
गरजू शिक्षण संस्थाचीही निवड अशीच होते. दरवर्षी साधारण तीन कोटी रूपयांच्या देणग्या दिल्या जातात. कोरोना काळातही हे काम सुरू आहे. उच्च शिक्षण, स्पर्धापरीक्षा, मेडिकल इंजीनियरिंग च्या विविध शाखांसाठी ही मदत केली जाते. शाळा बांधकामासाठी असेल तर टप्यागणिक त्याचे आर्किटेक्टचे प्रमाणपत्र देणगीदाराला जाते. पुणे आणि मुंबई परिसरातील हे कार्य आता विदर्भ, उर्वरित महाराष्ट्रातही वाढविण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यात जात, पात किंवा कुठलाही भेद न करता केवळ ज्ञानार्जनउत्सुक कळी ज्ञानाने फुलावी एवढीच भावना राखीत हे कार्य पुढे जात आहे. विविध पैलूंची माहिती देत सुरू असलेली ही ज्ञानगाथा प्रश्नोत्तरानंतर थांबली..
श्री चंद्रशेखर दीक्षित यांनी प्रारंभी प्रास्ताविक आणि परिचय करून दिला. श्री किशोर केळापुरे यांनी आभार प्रदर्शन केले.