Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जून ०८, २०२१

चंद्रपूरची दारुबंदी उठविण्याचे शासन आदेश पारित; परवाने नूतनीकरणासाठी एक खिडकी योजना





चंद्रपूर - जिल्हयात सन २०१५ पासून लागू असलेली दारुबंदी उठविण्याबाबत प्राप्त मागण्यांच्या अनुषंगाने सर्वंकष विचारविनिमय करुन निर्णय घेण्याच्या दृष्टीने शासनास शिफारस करण्यासाठी नेमण्यात आलेल्या श्री.रमानाथ झा , भाप्रसे ( सेवानिवृत्त ), माजी प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालातील समितीचे अभिप्राय , निष्कर्ष व शिफारशी , जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखालील समिक्षा समितीचा अहवाल तसेच, या विषयासंदर्भात शासनास प्राप्त झालेली निवेदने विचारात घेता चंद्रपूर जिल्हयातील दारुबंदी उठविण्याबाबत शासनाने निर्णय घेतला. त्याअनुषंगाने शासन आदेश दि. ०५.०३.२०१५ नुसार , दि .०१.०४.२०१५ पासून चंद्रपूर जिल्हयात लागू केलेली दारुबंदी उठविण्याचे शासन आदेश पारित केले आहेत.  


चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा , १९४९ मधील तरतुदी , त्याखालील वेगवेगळे नियम, आदेश, निर्देशानुसार जुन्या अबकारी अनुज्ञप्ती रितसर वैध करुन कार्यान्वित करुन देणे व शासनाच्या प्रचलित धोरणानुसार नवीन अबकारी अनुज्ञप्ती देण्याबाबत निर्देश देणे आवश्यक आहे. तसेच, शासन आदेश दि. ०५. ०३. २०१५ चंद्रपूर जिल्ह्यातील ज्या अनुज्ञप्तींचे दि .३१.०३.२०१५ अखेर नुतनीकृत होत्या व ज्या शासन परिपत्रक दि .१०.०३.२०१५ नंतर चंद्रपूर जिल्ह्यातून स्थलांतरित झालेल्या नाहीत, अशा अनुज्ञप्त्यांबाबत यथायोग्य निर्देश देणे क्रमप्राप्त असल्याने ते खालीलप्रमाणे देण्यात येत आहेत . 


चंद्रपूर जिल्ह्याबाहेर स्थलांतरीत न झालेले. जे तत्कालीन अनुज्ञप्तीधारक विनंती करतील त्यांच्या अनुज्ञप्त्या दि .३१.०३.२०१५ रोजी चंद्रपूर जिल्ह्यात जिथे कार्यरत होत्या, त्याच जागेवर " जैसे आहे, जेथे आहे " ( As Is , Where is ) या तत्वाप्रमाणे सन २०२१-२२ चे नुतनीकरण शुल्क रितसर शासन जमा शासन परिपत्रक क्रमांकः एमआयएस -०३२१ / प्र.क्र .५७ / राउशु -३ करुन नुतनीकरणाबाबत इतर आवश्यक बाबींची पुर्तता करुन कार्यान्वित करता येतील. मात्र, असे करतेवेळी मा. सर्वोच्च न्यायालयाने महामार्गालगतच्या मद्यविक्री अनुज्ञप्त्यांबाबत दिलेला निर्णय व तद्नुषंगाने , राज्य शासनाने वेळोवेळी दिलेले निर्देश विचारात घेऊन कार्यवाही करावी . चंद्रपूर जिल्ह्यात येथून पुढे उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने अबकारी अनुज्ञप्ती वैध करण्यासाठी नुतनीकरणास येणाऱ्या अर्ज प्रकरणी सहज व सुलभ कार्यपद्धतीचा ( एक खिडकी योजना ) अवलंब करुन प्रचलित नियमानुसार तात्काळ कार्यवाही करण्याची दक्षता आयुक्त , राज्य उत्पादन शुल्क व जिल्हाधिकारी , चंद्रपूर यांनी घ्यावी. दि .३१.०३.२०१५ पर्यंत नुतनीकृत असलेल्या परंतु , ज्या अनुज्ञप्तीचे मुळ अनुज्ञप्तीधारक दूर्दैवाने मृत झाले असतील अशा प्रकरणात मुळ अनुज्ञप्तीधारकांच्या वारसांत वाद नसल्यास एकूण वारसांबाबत प्रतिज्ञापत्र घेवून सर्व वारसांच्या लेखी संमतीने सदर अनुज्ञप्ती रितसर त्यांच्यापैकी एक किंवा अनेक वारसांच्या नावावर वर्ग होण्याच्या अधीन राहून संबंधित अनुज्ञप्तीचे रितसर तात्पुरत्या स्वरुपात व्यवहार , आवश्यक बाबींची पुर्तता करुन मुळ मंजुर जागी सुरु करता येतील. अशा प्रकरणी वारसांत वाद असल्यास , अशा अनुज्ञप्ती वारसांतील वाद संपेपर्यंत वैध व कार्यरत करण्याचा प्रश्न येणार नाही. अशा प्रकरणी यापुर्वीचे कुठलेही न्यायिक वा अर्धन्यायिक आदेश / निर्देश नसल्याची व असल्यास ते विचारात घेऊन योग्य कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी.
 ज्या अनुज्ञप्तींची पुर्वीची मंजुर जागा उपलब्ध नसेल, अशा अनुज्ञप्तीसाठी इतरत्र जागा प्रस्तावित केल्यास प्रचलित नियमातील तरतुदीनुसार तात्काळ स्थलांतराची आवश्यक कार्यवाही करावी. अन्य जिल्हयातून चंद्रपूर जिल्हयामध्ये अनुज्ञप्ती स्थलांतरीत करण्याबाबत मागणी प्राप्त झाल्यास त्याबाबत प्रचलित नियमातील तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करावी . प्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील बंद असलेल्या अनुज्ञप्ती सुरळीतपणे कार्यान्वित / नुतनीकृत करण्याबाबतची प्रक्रिया पारदर्शक , सहजसुलभ व जलदगतीने होण्यासाठी आयुक्त , राज्य उत्पादन शुल्क , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांनी इतर काही आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे त्यांच्या स्तरावरुन निर्गमित कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.