कोविडमुळे पालक गमाविलेल्या बालकांच्या संरक्षणाबाबत
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
Ø 257 बालकांचे एक पालक तर 7 जणांचे दोन्ही पालक दगावले
चंद्रपूर,दि. 24 जून : कोविडमुळे पालक गमाविलेल्या बालकांची काळजी व संरक्षण करण्याकरीता बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 नुसार सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या बैठकीला अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर,पोलिस उपअधिक्षक शेखर देशमुख,मनपा सहायक आयुक्त विद्या पाटील, बालकल्याण समिती अध्यक्ष अॅड.वर्षा जामदार, महिला व बालकल्याण अधिकारी रमेश टेटे, जिल्हा परिविक्षा अधिकारी श्री. दडमल, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर, स्थानिक गुन्हे शाखेच्या अपर्णा मानकर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, पालक गमाविलेल्या सर्व बालकांची स्वतंत्र फाईल तयार करा. जेणेकरून परिपूर्ण प्रस्ताव तयार होऊन शासकीय योजनेचा लाभ देतांना कोणतीही अडचण येणार नाही. तसेच प्रत्यक्ष भेटीदरम्यान निरीक्षणात आलेल्या बाबी, आर्थिक परिस्थिती, चर्चेतून मिळालेली माहिती फाईलमध्ये नोंदवून ठेवा. स्थावर मालमत्तेसंदर्भात ग्रामीण भागात ग्रामपंचायत तर शहरी भागात संबंधित नगर परिषदेला अधिकृतरित्या कळविणे गरजेचे आहे. तसेच दोन्ही पालक गमाविलेल्या बालकांच्या स्थावर व इतर मालमत्तेसंदर्भात जिल्हास्तरीय कृती दलाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
तर अपर जिल्हाधिकारी वरखेडकर म्हणाल्या, ज्या सात बालकांचे दोन्ही पालक कोव्हीडमुळे मृत्यु झाले आहे, त्यांच्या बँकेच्या व्यवहारासंदर्भात सदर बँकांना त्वरीत कळवा. तसेच एक पालक गमाविलेल्या कुटुंबाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया त्वरीत राबवा, अशा सुचना त्यांनी दिल्या.
कोव्हीडमुळे जिल्ह्यातील सात बालकांनी दोन्ही पालक गमाविले असून यात चंद्रपूरचे तीन बालके,चिमूर तीन आणि एक बालक सावली येथील आहे. तर एक पालक गमाविलेल्या बालकांची संख्या 257 आहे. तसेच बालकल्याण समितीसमोर 264 बालकांची यादी पुढील कार्यवाहीकरीता सादर करण्यात आली आहे. यापैकी सद्यस्थितीत संजय गांधी निराधार योजनेसाठी मंजूर प्रकरणाची संख्या 32 असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.